सावंतवाडी: सावंतवाडी येथील वैश्यवाडा आणि उभाबाजार येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मोठा उत्साह दिसून आला. दोन्ही मंदिरांमध्ये मिळून हजारो मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला, ज्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
वैश्यवाडा येथील हनुमान मंदिरात गणेशोत्सव
वैश्यवाडा येथील हनुमान मंदिरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात सुरू आहे. संकष्टी चतुर्थीच्या खास निमित्ताने येथील भाविकांनी सुमारे ५,१२१ मोदकांचा नैवेद्य श्रींच्या चरणी अर्पण केला. सकाळी पुरोहित गणेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक अथर्वशीर्ष पठण झाले आणि त्यानंतर महाआरती करण्यात आली. गौरेश मिशाळ यांनी श्रींची पूजा केली. यावेळी हनुमान मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक म्हापसेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, आणि इतर अनेक मान्यवरांसह वैश्यवाडा येथील शेकडो रहिवासी उपस्थित होते. उत्सवकाळात रोज भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
उभाबाजार येथील मंदिरातही हजारो मोदकांचा नैवेद्य
सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरातही संकष्टी चतुर्थीनिमित्त गणेश मूर्तीसमोर हजारो मोदकांचा नैवेद्य ठेवण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, ज्यात महिला भाविकांचा मोठा सहभाग होता. या मंदिरात दरवर्षी २१ दिवसांसाठी बाप्पाची मूर्ती विराजमान होते. या खास पूजेचा मान यंदा अनंत जाधव यांना सपत्नीक देण्यात आला. ब्राह्मणांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठणही करण्यात आले. १६ सप्टेंबर रोजी भव्य विसर्जन मिरवणूकीने होणार आहे. उभाबाजार हनुमान मंदिर आणि वैश्यवाडा हनुमान मंदीरात प्रतिष्ठापना केलेल्या श्रींचे थाटात विसर्जन करण्यात येणार आहे.
वैश्यवाडा गणेशोत्सव समितीने मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्याचे जाहीर केले आहे. या मिरवणुकीत ‘देवीचा गोंधळ’ ही संकल्पना असणार असून भजन, हलगी वादन, आणि इतर विविध कार्यक्रमांचा समावेश असेल. या सर्व कार्यक्रमांचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.