सांगली : आंध्र प्रदेशात गलाई व्यावसायिकांच्या घरावर दरोडा टाकून १ कोटी ७७ लाख रूपयांच्या सोन्यासह पलायन केलेल्या तिघांच्या टोळीला सांगलीजवळ बुधगाव येथे सांगली पोलीसांनी आंध्र प्रदेश पोलीसांच्या मदतीने शुक्रवारी अटक केली.

नामदेव देवकर यांचा वंगुरवाडी रोड, टुनुक आंध्र प्रदेश येथे गलाई व्यवसाय असून ते त्याच ठिकाणी पत्नीसह वास्तव्यास आहेत. गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजणेच्या सुमारास दुकानातील कामगार सूरज कुंभार व त्याचे साथीदारांनी घरात घुसून हत्याराचा धाक दाखवून हातपाय बांधून व तोंडाला चिकटपट्टी लावून तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने, बिस्किटे व एक लाखाची रोखड असा १ कोटी ७७ लाख ८१ हजाराचा ऐवज लंपास केला. तिघांनीही दरोडा टाकून फिर्यादी देवकर यांची अल्टो मोटार घेउन पलायन केले होते.

आणखी वाचा-“घराघरांत ड्रग्स पोचतंय, १०० विद्यार्थ्यांच्या आत्महत्या…”, ‘उडता नाशिक’चा उल्लेख करत राऊतांचा गंभीर आरोप

याबाबत टुनुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संशयित सांगली जिल्ह्यात आल्याची तांत्रिक माहिती आंध्र पोलीसांना मिळाली. पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे व उप निरीक्षक कुमार पाटील आणि सहकारी व आंध्रचे उप अधिक्षक सी.सरथ राजकुमार, निरीक्षक सी.एच. अंजनवेलु आदींच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथक संशयितांच्या मागावर होते. या पथकाला बुधगाव येथे एका ढाब्यावर तिघे संशयितांना आढळले. त्यांना पलायनाची संधी न देता पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता दरोड्यात लुटलेले सोने पिशवीत आढळले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी सूरज कुंभार (वय ३३, कुर्ली ता. खानापूर), कैलास शेळके (वय ३० रा. बामणी, ता. खानापूर) आणि सादीक शेख (वय ३५ रा. इचलकरंजी) या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी आंध्र प्रदेश पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.