राहाता : तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावातील दोन दलित कुटुंबावर गावातील जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी तीन आरोपींना शनिवारी अटक केली असून, अन्य आरोपींच्या शोधासाठी धरपकड सुरू झाल्याने गावातील शेकडो ग्रामस्थ गाव सोडून गेले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीतून घडलेल्या या घटनेमध्ये गावात राहणाऱ्या दोन दलित कुटुंबांना ४०० ते ५०० जणांच्या जमावाने मारहाण केली. या वेळी त्यांच्या घरांना आग लावण्यात आली. घरातील साहित्याची, वाहनांची तोडफोड करत नुकसान करण्यात आली आहे. याप्रकरणी गावातील ७१ जणांविरुद्ध ‘अ‍ॅट्रासिटी’सह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटना होऊन तीन दिवस झाले तरी कोणासही अटक न झाल्याने याबद्दल सर्वत्र निषेध सुरू झालेला होता. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी या प्रश्नावरून थेट सरकारला धारेवर धरले आहे. तसेच दलित नेत्यांनीही तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> कांदा निर्यातबंदी विरोधात शरद पवार रस्त्यावर

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आज तीन आरोपींना शनिवारी अटक केली आहे. विकास बाळकृष्ण निर्मळ (४७), सोपान कारभारी निर्मळ (वय ५८) व  मयूर भीमराज निर्मळ (वय २७ ) असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. या तीन आरोपींना कोपरगाव न्यायालयाने १३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी दोन पोलीस पथके तैनात करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली.

दरम्यान, उर्वरित आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू होताच निर्मळ पिंप्री गावातून शेकडो ग्रामस्थ परागंदा झाले आहे. या हल्ल्यानंतर गाव सोडून गेलेले कोळगे कुटुंबीय संरक्षणाची हमी दिल्यानंतर आज पुन्हा आपल्या घरी वास्तव्यास आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना संरक्षण देण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी सायंकाळी गावास भेट दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आला असून, गावातील सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी केले.