scorecardresearch

आंबोली घाटातील मृतदेहप्रकरणी आणखी तिघेजण अटकेत

या खून प्रकरणात आणखी संशयिताचा सहभाग असल्याची माहिती डॉ. सोळंके यांनी दिली.   

arrest-7
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

सावंतवाडी  : पंढरपूर येथील व्यक्तीचा खून कराड येथे करून मृतदेह आंबोली घाटात टाकण्याचा प्रयत्न करताना दुसराही खाली कोसळून मृत्यू झाल्याप्रकरणी एकजण पोलीस कोठडीत आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांनी जलदगतीने तपास करत आणखी तिघांना या प्रकरणी अटक केली आहे. त्यांना उद्या सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पंढरपूर येथील सुशांत खिल्लारे याच्या खूनप्रकरणी सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी कराड येथे तपास करीत या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी तीन संशयितांना अटक केली आहे. अभय पाटील त्याचा कामगार बळीवंत तसेच भाऊसाो माने याचा चुलत भाऊ राहुल माने अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या खून प्रकरणात आणखी संशयिताचा सहभाग असल्याची माहिती डॉ. सोळंके यांनी दिली.   

पंढरपूर येथील वीटभट्टी मुकादम सुशांत खिल्लारे याच्या खूनप्रकरणी सहभाग असलेला पहिला संशयित भाऊसाो माने याचा आंबोली घाटात खोल दरीत मृतदेह फेकण्याच्या नादात पडून मृत्यू झाला तर दुसरा संशयित तुषार पवार याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर खून, अपहरण, पुरावे नष्ट करणे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याला सोबत घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सोळंके यांनी कराड येथे घटनास्थळी भेट देत तपास केला. यात सुशांत खिल्लारे याला भाऊसाो माने याच्या फार्म हाऊसमधील शेताकडील मोडक्या वाडय़ात डांबून ठेवत सतत मारहाण केली जात होती. त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान खिल्लारे याला उचलून आणण्यापासून ते कोंडून ठेवणे, मारहाण करणे हे प्रकार भाऊसाो माने व त्याच्या घरच्यांना माहिती नव्हते.

बाहेरच्या बाहेर हे सगळे सुरू होते. घटनेच्या दिवशी संशयित भाऊसाो माने, तुषार पवार यांच्यासोबत अन्य काही जणदेखील मारहाणीत सहभागी होते अशी माहिती ताब्यात असलेला दुसरा संशयित तुषार पवार याने पोलिसांना दिली. त्यावरून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात अभय पाटील, त्याचा कामगार बळीवंत व चुलत भाऊ राहुल माने या तिघांचादेखील खून प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. यात आणखी काही मित्रांचादेखील समावेश असून त्यांचा शोध सुरू असल्याचे तपासी अधिकारी डॉ. सोळंके यांनी सांगितले. या सर्वानी सुशांत खिल्लारे याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला असे तपासात पुढे आले आहे. याबाबत अधिक तपास उपविभाग पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 03:52 IST