राज्य शासनाने नुकत्याच एका अधिसूचनेद्वारे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्य़ात प्राणहिता, यवतमाळ जिल्ह्य़ात ईसापूर आणि पुणे जिल्ह्य़ातील सुधागड या तीन नवीन अभयारण्यांची घोषणा केली आहे.
आलापल्ली हे विस्तीर्ण वनांचे प्रातिनिधिक क्षेत्र म्हणून व कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला लागून असलेल्या आणि प्राणहिता नदीपर्यंत पसरलेल्या भागाच्या वनक्षेत्राचा समावेश करून प्राणहिता वन्यजीव अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे. ४२० चौरस किलोमीटरच्या या अभयारण्यात मध्यभारतातील लुप्तप्राय जंगली म्हैसच्या संवर्धनात भर घालण्यात आली आहे. उध्र्व पैनगंगा प्रकल्पाचे ईसापूर जलाशय हे पाणपक्ष्यांकरिता आश्रयस्थान समजले जाते. केंद्र शासनाने या प्रकल्पास मंजुरी देताना या ठिकाणी अभयारण्याच्या निर्मितीची अट घातली होती.
सर्वोच्च न्यायालयानेही माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र कमी करताना पाच नवीन अभयारण्ये स्थापन करावी, असे आदेश दिले होते. त्यातही या अभयारण्याचा समावेश होता. त्यामुळे आता हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम घाट रांगेतील रायगड व पुणे जिल्ह्यांतर्गतच्या जैवविविधतेने नटलेल्या ताम्हणी, सुधागड व राजमाची येथील वनक्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा विषय १९९८ पासून विचाराधीन होता. ४९.६२ चौरस किलोमीटरच्या ताम्हणी अभयारण्याची यापूर्वीच ५ मे २०१३ च्या अधिसूचनेद्वारे निर्मिती करण्यात आली होती. आता त्याला लागूनच सुधागड अभयारण्याचीही निर्मिती करण्यात आली आहे.
१५ नवी संरक्षित क्षेत्रे
राज्यात संरक्षित जाळ्यांमध्ये सहा राष्ट्रीय उद्याने, ४७ अभयारण्ये व ४ संवर्धन राखीव क्षेत्र समाविष्ट आहेत. या ५७ संरक्षित जाळ्यांचे एकूण क्षेत्रफळ १००५२.०० चौरस किलोमीटर झाले आहे. यापैकी सहा राष्ट्रीय उद्याने व चौदा अभयारण्यांचा समावेश सहा व्याघ्र प्रकल्पात करण्यात आला आहे. पाच वर्षांत १७२९.० चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश करून १५ नवीन संरक्षित क्षेत्रे स्थापन करण्यात आली आहेत.