जंगल परिसरात दुचाकीवरून फिरायला गेलेल्या प्रेमीयुगुलावर वाघानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली येथे घडली आहे. या हल्ल्यात प्रियकर तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रेयसी तरुणी स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी ठरली आहे. संबंधित घटना मंगळवारी दुपारी उसेगाव जंगल परिसरात घडली. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दीड ते दोन तास शोध मोहीम राबवल्यानंतर मृत तरुणाचा मृतदेह गावकऱ्यांना सापडला आहे.

अजित सोमेश्वर नाकाडे असं मृत पावलेल्या २१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी मंगळवारी तो आपल्या प्रेयसीला घेऊन उसेगाव जंगल परिसरात फिरायला गेला होता. दुचाकीवरून फिरत असताना दबा धरुन बसलेल्या वाघानं अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी वाघाने अजितला जंगल परिसरात ओढत नेलं. दुसरीकडे, अजितच्या मैत्रिणीनं घटनास्थळावरून पळ काढला आणि घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकरी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात शोध मोहीम राबवली. दीड ते दोन तास शोधाशोध केल्यानंतर अजितचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी जंगल परिसरात अशाप्रकारे फिरू नये, असं आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.