धाराशिव : मागील दोन महिन्यांपासून बचाव पथकाला चकवा देणारा वाघ रविवारी पुन्हा एकदा गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे. डार्ट गनच्या माध्यमातून वाघावर निशाणा रोखला मात्र ऐनवेळी अंदाज हुकला. डार्टगनचा शॉट वाया गेला आणि पुन्हा एकदा बचाव पथकाच्या तावडीतून वाघ निसटून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून रामलिंगच्या अभयारण्यात मुक्कामी असलेला वाघ सापडणार कधी? हा  प्रश्न अजूनही कायम आहे.

मागील दोन महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीवर वाघ वावरत असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठी भीती पसरली आहे. टिपेश्वर येथून आलेल्या या वाघाने सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्याच्या सरहद्दीवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दीड महिन्यांपूर्वी 19 डिसेंबर रोजी येडशी येथील पाणवठ्यावर लावलेल्या ट्रॅक कॅमेर्‍यात पहिल्यांदा वाघाचे छायाचित्र कैद झाले. तेंव्हापासून मागील 54 दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 28 पेक्षा अधिक प्राण्यांवर वाघाने हल्ला केल्याच्या घटना आहेत.

सध्या या वाघाचा वावर रामलिंगच्या अभयारण्यात असून पुणे येथून आलेल्या बचाव पथकाकडून वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. रविवारी रामलिंग मंदिराच्या परिसरात पहिल्यांदा डार्टगनचा वापर करण्यात आला. ताडोबा येथून आलेल्या पथकाने मागील दोन आठवड्यांपासून वाघाला पकडण्यासाठी ठाण मांडले आहे. यापूर्वी या बचाव पथकाने अशा प्रकारे गनचा वापर केलेला नव्हता. मात्र रविवारी गनचा वापर करून पुण्याच्या पथकाने शूट करण्याचा प्रयत्न केला. वाघाला चाहूल लागली आणि त्याने अंधारात धूम ठोकली. पुन्हा एकदा बचाव पथकाला गुंगारा देण्यात वाघ यशस्वी झाला. बार्शी आणि धाराशिवच्या परिसरात हा वाघ सध्या फिरत आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांना त्यापासून मोठा धोका अद्यापही कायम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघाची शिकार, बिबट्याची मौज चोराखळी शिवारात वाघाने आठ दिवसांपूर्वी एका बैलाची शिकार केली. बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले. वाघाच्या शिकारीत मृत पडलेल्या बैलाला जंगलात नेवून वाघाला पुन्हा पकडण्यासाठी सापळा लावला. मृत बैलाजवळ वाघ  पुन्हा येईल, असा अंदाज पथकाने बांधला. कॅमेरा लावून वाघ पकडण्याची सगळी तयारी केली. मात्र वाघाने केलेल्या शिकारीवर बिबट्याने मौज मारली आणि पुन्हा एकदा बचाव पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.