जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतींसाठी उद्या शनिवारी मतदान होत असून, प्रचार संपल्यानंतर मतदारांना भुलवण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होऊ नयेत यासाठी अख्खी रात्र बहुसंख्य उमेदवारांनी जागून काढली. ज्या गावात चुरस आहे, त्या ठिकाणी एकमेकांवर वॉच ठेवण्यासाठी खास कार्यकर्त्यांची नियुक्ती उमेदवारांनी केली होतीच, पण शेवटचा दिवस अधिक काळजीचा असल्याने कुठे गांधीबाबा, कुठे साडी, कुठे अक्काबाईचा वावर गुप्तपणे करण्यात येत होता.
जिल्ह्यात होत असलेल्या ९७ पकी ५ गावच्या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मिरज, तासगाव, खानापूर, शिराळा, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, शिराळा आणि जत तालुक्यातील ९४ गावांत उद्या मतदान होत आहे. मतदानाची निवडणूक कार्यालयाने व्यवस्था केली असून, आज सर्व मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी मतदान साहित्यासह रवाना करण्यात आले.
ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक होत नसली तरी राजकीय कार्यकत्रे गावपातळीवर राजकीय ताकद अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रचाराचा धूमधडाका शुक्रवारी संपला असला तरी मतदानाला प्रारंभ होईपर्यंत गुप्त प्रचाराला मुभा असल्याने उमेदवार अंतिम तयारीत गुंतले आहेत. मतदान केंद्रावर बूथ लावण्यापासून मतदाराला पुन्हा एकदा आठवण करण्यासाठी मतदाराच्या घरचे उंबरठे झिजवत होते.
प्रचारात भावकी, गल्ली, वाडीवस्ती याला जसे महत्त्व आहे तसे उमेदवाराची कुवतही महत्त्वाची ठरत असल्याने गेल्या आठ दिवसांत गुलाल, भंडारा उचलण्यापासून शपथा घेण्यापर्यंतचे प्रयोग प्रचारात पार पडले आहेत. यंदा प्रथमच गावपातळीवरील प्रचारासाठी व्हॉट्स अॅपसारख्या समाजमाध्यमांचा प्रचारासाठी मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला. तरुणाईच्या मुठीत थेट उमेदवाराची छबी पोहोचवण्यासाठी मोबाइलसाक्षर तरुणवर्ग अनेक उमेदवारांनी तनात केले होते.
एक गठ्ठा मतदान वळवण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होणार हे गृहीत धरून अशा काठावरच्या मतदारांवर स्वतंत्रपणे वॉच ठेवण्यात आजची अख्खी रात्र जागून काढावी लागली. हाताला लागण्यात अडचणीचे ठरणारे मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी गांधीबाबा, साडी, देशी यांचाही वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर मद्यविक्रीला कालपासून बंदी असली तरी निवडणूक असणाऱ्या गावात सरसकट मद्यप्राशन करणारे आढळून येत होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2015 रोजी प्रकाशित
सांगलीतील ९२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतींसाठी उद्या शनिवारी मतदान होत असून, प्रचार संपल्यानंतर मतदारांना भुलवण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होऊ नयेत यासाठी अख्खी रात्र बहुसंख्य उमेदवारांनी जागून काढली.
First published on: 25-07-2015 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today vote for 92 panchayats in sangli