आणखी एक मोठा नेता भाजपाच्या गळाला लागला आहे. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. राष्ट्रवादीनंतर भाजपाने काँग्रेसलाही खिंडार पाडले आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण हे तीन तालुके माढा मतदारसंघात येतात. या भागात रणजितसिंह यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपसाठी फायद्याची ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजयसिंह मोहिते पाटिल यांच्यानंतर रणजितसिंह यांचा भाजपात प्रवेश होत आहे. त्यामुळे माढामधील भाजपाचा उमेदवार कोण? याबाबत पेच निर्माण झाला आहे. फलटणच्या निंबाळकरांना भाजपाकडून माढ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माढा मतदार संघात राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सुजय विखे , रणजितसिंह मोहिते पाटील आणि भारती पवार यांच्यानंतर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव भाजपाबरोबर जोडलं जाणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस पक्षात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंतर्गत कलहामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. परभणीतील राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. समीर दुधगावकर यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomorrow ranjitsing naik nimbalkar will enter in bjp
First published on: 24-03-2019 at 11:11 IST