पंढरपूर : गेल्या तीन दिवसांपासून वळवाच्या पावसाने तालुक्याला झोडपून काढले आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मान्सून पूर्व कामे पालिकेने वेळेत न केल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. तसेच या पावसाचा फटका आंबा, केळी, डाळिंब, कांदा पिकांना बसला असून, तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे.

राज्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली. मे महिन्यात उन्हाचा पारा ४३ पर्यंत गेला होता. उन्हाने शहरातील नागरिकांसह दर्शनासाठी येणारे भाविकही हैराण झाले होते. मात्र, गेले तीन दिवस पावसाने झोडपून काढले. शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याची घटना घडली आहे. दुकाने, काही ठिकाणी घरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. पालिकेचा मान्सून पूर्व कामे केवळ कागदावरच आणि वरिष्ठांच्या बैठकीत सांगण्यापुरती झाली, अशी तक्रार नागरिकांनी केली. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून शहरातील पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याची माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली आहे.

पावसामुळे तालुक्यातील तावशी, तुंगत, बाभुळगाव, आढीव, रोपळे, शेटफळ, खेडभाळवणी, गादेगाव, शिरगाव, कोर्टी, बोहाळी आदी गावांतील १५४ शेतकऱ्यांचे ९३.३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अवकाळी पाऊस व वादळामुळे एकलासपूर येथील तीन घरांची पडझड झाली असून, शिरगाव येथे अंगावर झाड पडून एक गाय मयत झाली आहे. याबाबतचे पंचनामे करण्याचे कामकाज सुरू असल्याची माहिती तहसीलदार लंगुटे यांनी दिली. तसेच ३१ मे पर्यंत अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानीबाबतचे पंचनामे करून १ जूनपर्यंत कृषी सहायक, ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश तहसील कार्यालयाकडून देण्यात आले असून, तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल, असेही तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले. असे असले तरी सध्या उन्हाळ्याची सुट्टी आहे. त्यामुळे रोज मोठ्या संख्येने भाविक पंढरीत दर्शनासाठी येत आहेत. त्यांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. मात्र, भाविकांनी पहिल्या पावसाचा आनंद लुटला आहे.