छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यात २ डिसेंबर रोजी होणाऱ्या  ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यास सकल मराठा समाजाचा विरोध असल्याचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याने संविधानिक पदावरील कोणीही येऊ नये असे आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. शिवाय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रचार केला जाणार असल्याचा आरोप करत पवार यांनी दौरा केला, तर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.

 अलीकडेच भुजबळ यांनाही १२ लघु संदेश पाठवून धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला होता. सौदागर सातनाक या व्यक्तीच्या दूरध्वनी क्रमांकावरून हा धमकीचा संदेश आल्याचे छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गंगापूर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. या संमेलनाच्या उद्घाटनास अजित पवार आणि समारोपास धनंजय मुंडे यांची उपस्थिती असेल असे सांगण्यात आले आहे. मात्र, उद्घाटनापूर्वीच मराठा संघटनांनी नेत्यांना विरोध करत इशारा देणारे पत्रक प्रशासनास दिले आहे.

हेही वाचा >>>भाजपा आमदाराचा उल्लेख करत जरांगे-पाटलांचा धनंजय मुंडेंना सूचक इशारा; म्हणाले, “परळीत…”

जरांगे यांची जालना येथे जंगी सभा घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी दीड महिन्यापूर्वी गावबंदीची घोषणा केली. त्याचा फटका अनेक नेत्यांना बसला होता. दरम्यान, हिंगोली येथे ओबीसी समाजाचे नेते बबन तायवडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.