जालन्यातील सभेत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आमि भाजपा आमदार नारायण कुचे यांना लक्ष्य केलं. नारायण कुचे ओबीसी नेत्यांना काड्या लावायचं काम करतात. तर, धनंजय मुंडे बीडमधील लोकांना गुन्ह्यांमध्ये गुंतवणार असल्याचंही नारायण कुचेंनी सांगितल्याचा दावा जरांगे-पाटलांनी केला आहे.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “आमदार नारायण कुचेंना चांगलं मानत होतो. पण, तिकडे ओबीसी नेत्यांना काड्या लावायचं काम ते करतात.”
“आता मुंडे कुठे जाणार”
“बीडमध्ये तरूणांना त्रास होत असून मध्यस्थी करण्यासाठी कुचेंना सांगितलं. मग, कुचेंनी पालकमंत्री धनंजय मुंडेंसी संपर्क साधला. तेव्हा धनंजय मुंडेंनी कुचेंना म्हटलं की, ‘तुम्ही तुमचं बघा, मला जे करायचे, ते मी करतो. मी लोकांना गुंतवणार.’ धनंजय मुंडे बीडच्या लोकांना गुंतवणार असल्याचं बोलत आहेत. परळीत एक लाख चार हजार मराठे आहेत. त्यांचं मतदान धनंजय मुंडेंना होते. आता मुंडे कुठे जाणार,” असा सूचक इशाराही जरांगे-पाटलांनी दिला आहे.
हेही वाचा : “२४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा…”, जरांगे-पाटलांनी सरकारला दिला थेट इशारा
“…अन्यथा कायम ऊसतोड करायला जावं लागेल”
“बीड आणि अंतरवालीतील मराठा कार्यकर्ते कुचेंनीच गुंतवले आहेत. नारायण कुंचेंनी आमचा गेम करायचा नाही. अन्यथा कायम ऊसतोड करायला जावं लागेल. आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचे आदेश कुणी दिले, ही कुचेंनी सांगावं. गृहमंत्र्यांनी दिले की, तुम्ही शाळा केली आहे,” असा सवालही जरांगे-पाटलांनी कुचेंना विचारला आहे.
“मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आम्हाला शांत राहून द्यावं”
“आम्हाला गुन्ह्यांनी काही होत नाही. पोलिसांना पाहिल्यावर आम्हाला काहीच वाटत नाही. कारण, पोलिसांनी आम्हाला खूप मारलं आहे. आम्ही हे विसरलो नाही. कारण, माझ्या मात-माऊलींना मार लागला आहे. हिशोब होणारच… फक्त मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आम्हाला शांत राहून द्यावं. प्रत्येकवेळी मराठ्यांनी तुमच्या शब्दाचा सन्मान केला आहे,” असंही जरांगे-पाटलांनी सांगितलं.