सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत १७ पकी १५ जागा बिनविरोध झाल्या तर महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. तथापि, संघाच्या अध्यक्षपदासाठी आतापासूनच चार-पाच इच्छुकांमध्ये चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  
सोलापूर जिल्ह्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत वाढलेली गटबाजी, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी प्रवेश घेऊन दिलेली अयशस्वी लढत या पाश्र्वभूमीवर जिल्हा दूध संघाच्या निवडकीकडे सर्वाचे लक्ष वेधले होते. ही निवडणूक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम समजली जात असतानाच अखेर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून दूध संघात सत्ता वाटून घेण्याची भूमिका घेतली. संचालकपदे स्वत कडे ठेवण्यात बऱ्याच नेत्यांनी धन्यता मानली.  
बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार दिलीप माने, माढय़ाचे संजय शिंदे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे पुतणे योगेश सोपल, मंगळवेढय़ाचे बबन अवताडे आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.  
यातील प्रशांत परिचारक व संजय शिंदे या दोघांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम ठोकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले होते. परंतु त्यामुळे या दोघांना यशस्वी होता आले नसले तरी राष्ट्रवादीचे मात्र नुकसान झाले होते. संजय शिंदे हे अजित पवार यांचे निष्ठावंत समजले जात. माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू असलेले संजय शिंदे यांनी आता जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर विद्यमान अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी यापूर्वी काटकसरीचा व नियोजनबध्द कारभार पाहून दूध संघाचा गाडा यशस्वीपणे चालविला आहे. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेता अध्यक्षपदासाठी परिचारक हे पुन्हा दावा सांगू शकतात. प्रशांत परिचारक यांनीही राष्ट्रवादीचा मार्ग सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर विधानसभा निवडणूक लढविली होती. पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे पुतणे असलेले प्रशांत परिचारक हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. या पाश्र्वभूमीवर दूध संघाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे कायम राहणार काय, हा चच्रेचा विषय ठरला आहे. योगेश सोपल व माजी आमदार दिलीप माने हे दोघेही अध्यक्षपदासाठी व्यूहरचना करीत असल्याचे समजते. तर नुकतेच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदावरून पायउतार झालेले मनोहर डोंगरे हे आपले पुनर्वसन होण्यासाठी दूध संघाच्या अध्यक्षपदावर दावा करू लागले आहेत. त्यांना दूध संघाचा अनुभव आहे. मंगळवेढय़ाचे बबन अवताडे यांचाही ज्येष्ठतेनुसार अध्यक्षपदावर दावा असल्याचे सांगितले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tough competition for presidency of solapur milk union
First published on: 06-06-2015 at 03:00 IST