सोलापूर : सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये एका टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कारखान्याचे मालक आणि कामगारांच्या कुटुंबीयांसह आठ जणांचा झालेला करुण अंत आणि कोट्यवधी रुपयांची झालेली हानी यामुळे सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मर्यादा उघड झाल्या आहेत.

महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा आतापर्यंत उदासीनतेचा राहिला आहे. जेव्हा आगीची एखादी मोठी दुर्घटना घडते, तेव्हा या प्रश्नावर नुसतीच चर्चा होते. अग्निशमन दलाची यंत्रणा अत्याधुनिक राहिली असती तर अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सेंट्रल टेक्स्टाइलला लागलेल्या आगीची इतकी मोठी भीषणता कदाचित टळली असती, अशी प्रतिक्रिया उद्योजक मंडळींतून व्यक्त होत आहे.

सुमारे १२ लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहर परिसरात होटगी रोड, अक्कलकोट रोड आणि चिंचोली अशा ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. यात शेकडो कारखाने कार्यरत असून, त्यावर हजारो कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. परंतु या औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन दलाची यंत्रणा अद्ययावत करण्याकडे आतापर्यंत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. पालिकेच्या अग्निशमन दलाचे शहरात केवळ पाच केंद्रे आहेत. आगीची घटना घडल्यानंतर तेवढ्याच तत्परतेने दुर्घटनास्थळी पाण्याचे बंब धावून जाण्यासाठी अग्निशमन केंद्रांची संख्या दुप्पट करणे अपेक्षित आहे. पाण्याच्या बंबांमध्ये पाणी भरण्यासाठी सध्या रूपाभवानी मंदिराजवळील पाणी गिरणी आणि गुरूनानक चौक उद्यान अशा अवघ्या दोनच ठिकाणी व्यवस्था आहे. त्याचा आणखी किमान पाच ठिकाणी विस्तार व्हायला हवा. विशेषतः औद्योगिक वसाहतींच्या परिसरात पाणी भरण्यासाठी व्यवस्था तत्काळ उभारण्यात यावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी केली आहे. अग्निशमन दलाकडे उपलब्ध असलेले पाण्याचे बंब सहा हजार लिटर क्षमतेचे आहेत. त्यात सुधारणा करून १२ हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे बंब उपलब्ध व्हावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सेंट्रल टेक्स्टाइलला पहाटे लागलेल्या आगीची भीषणता दिवस उजाडल्यानंतर लक्षात आली. पाण्याचा पहिला बंब येऊन गेल्यानंतर दुसरा बंब येण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागत होता. त्यात एमआयडीसीअंतर्गत खड्डेमय रस्त्यांमुळे बंबास विलंब होत होता.

अग्निशमन यंत्रणा अत्याधुनिक होण्यासाठी सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने प्रस्ताव मंजूर केला होता. यात एखाद्या जळीतग्रस्त इमारतीच्या १७ व्या मजल्यावरील आग आटोक्यात आणण्यासाठी जर्मन बनावटीची यंत्रणा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव समाविष्ट होता. परंतु नंतर पाठपुराव्याअभावी मंत्रालयात हा प्रस्ताव रखडला आहे. सध्या अग्निशमन दलाकडे सध्या ३५ फूट उंचीपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा आहे. परंतु सध्या शहरात १७ मजले उंचीच्या इमारती उभारल्या जात आहेत. अशा इमारतींवरील शेवटच्या मजल्यावरील आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही, याकडे माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी लक्ष वेधले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन यंत्रणेच्या आधुनिकीकरणाच्या मुद्द्यावर दलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश साळुंखे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले. सेंट्रल टेक्स्टाइलला लागलेल्या भीषण आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसल्याचे साळुंखे यांच्याकडून समजले. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन निरीक्षण केले. परंतु त्यातून दुर्घटनेचे निश्चित कारण स्पष्ट झाले नाही. दरम्यान, एकीकडे या दुर्घटनेची दखल राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत घेण्यात आली असताना प्रत्यक्षात आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर महापालिका, महसूल, पोलीस व इतर प्रशासकीय यंत्रणेतील एकही वरिष्ठ अधिकारी फिरकला नाही, ही बाबही समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले आहे.