सांगली : सांगली, मिरज शहरात पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चौका-चौकात भगव्या पताका, शामियाने लावून शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करून अभिवादन करण्यात आले. मिरज शहरात महाराणा प्रताप चौक येथे संघटित हिंदू संघटनेच्यावतीने शिवजयंतीला आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ. सुरेश खाडे यांनी विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव मंडळांना भेटी देत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

मंगळवारी सकाळपासूनच शहरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येत होता. मुख्य चौक आणि गल्लीबोळांतून मंडळांनी शिवजयंतीनिमित्त भगवे ध्वज, भगव्या पताका लावल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी शिवप्रतिमा पूजनासाठी अस्थायी शामियाने उभारण्यात आले होते. ध्वनिवर्धकावर शाहिरी पोवाडे लावण्यात येत होते.संघटित हिंदू संघटनेच्या वतीने महाराणा प्रताप चौकात, हिंदू एकताच्या वतीने हिंदमाता चौकात, रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने मिरज रेल्वे स्थानकासमोरील आवारात, शिवकल्याण समितीच्या वतीने ब्राह्मणपुरी परिसरात, शिवाजी चौकात शिवतीर्थ समितीच्या वतीने भव्य प्रमाणात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे किल्ला भाग, शिवनेरी चौक, स्फूर्ती चौक, मालगाव वेस, दिंडी वेस, पाटील हौद, शनिवार पेठ, बुधवार पेठ, गाडवे चौक, शास्त्री चौक, गांधी चौक, कर्मवीर भाऊराव चौक, जवाहर चौक अशा अनेक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ब्राह्मणपुरी परिसरात शिवकल्याण मंडळाच्या वतीने शिवप्रतिमा पूजन व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आ. खाडे यांनी विविध मंडळांना भेटी देत शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी माजी स्थायी सभापती पांडुरंग कोेरे, मोहन वाटवे, जितेंद्र ढोले, निरंजन आवटी, जयगोड कोरे, गजेंद्र कुल्लोळी आदी उपस्थित होते.