खेड : कोकणातील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे पुर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे शिमगोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. कशेडी येथील बोगद्यामधील वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणताच अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता तात्पुरत्या स्वरुपात जनरेटरची  व्यवस्था करण्यात आली आहे.

कशेडीतील दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११ के. व्ही. क्षमतेच्या विजेची मागणी केली असून  त्यासाठी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याबाबत सुचित केले होते.  अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लावणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही बोगदे पूर्णक्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील की, नाही याबाबत सांशकता निर्माण झाली होती.

चाकरमान्यांच्या  वाढणा-या वाहनांची संख्या लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन्ही बोगद्यात जनरेटरची सुविधा उपलब्ध केली आहे. दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा कार्यान्वीत होईपर्यंत विजेचा अडथळा निर्माण झाल्यास जनरेटरवरच विद्युत पुरवठा करून बोगद्यातून पूर्णक्षमतेने वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजेसाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होताच दोन्ही बोगद्यात ११ केव्ही वीज उपलब्ध होणार आहे.  यामुळे दोन्ही बोगद्यातून २४ तास विनाअडथळा वाहतूक सुरू राहून दोन्ही बाजूने वाहनचालकांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होईल, असेही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून स्पष्ट करण्यात आले.