सांगली : सांगलीतील डॉल्फिन ग्रुपच्या सदस्यांनी पाश्चात्त्य पध्दतीने साजर्या होत असलेल्या मैत्री दिनाचे औचित्य साधून दंडोबा परिसरात वृक्षारोपण व बीजारोपण करत फ्रेंडशिप डे’ साजरा केला. रविवारी दंडोबा परिसरात वड, पिंपळ, जांभूळ,कडुनिंब, करंज, रामफळ पळस यांसारखी पर्यावरणास उपयुक्त रोपे लावण्यात आली. तर कांचन, ताम्हण, शंकेडर,कडुनिंब, करंज, काटेसावर, शिकेकाई, अंजन, खैर, शाल्मली, पळस, गोकर्ण, बेहडा यांसारख्या देशी व स्थानिक उपयुक्त झाडांच्या हजारो बियाही प्रत्यक्ष टोकण्यात आल्या.
संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे यांच्या संकल्पनेतून गेली 26 वर्षे निसर्गाशी मैत्री हा उपक्रम डॉल्फिन नेचर ग्रुप’ तर्फे अविरतपणे सुरू आहे. यामध्ये युवा पिढी ही सहभागी होते. यापूर्वी अभयारण्य क्षेत्रात 16 वर्षे वृक्षारोपण, बीजारोपण, वनबंधारे उभारणी तसेच निसर्ग मैत्री कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमांतून तसेच आटपाडी तालुययातील मानेवाडी येथे तीन वर्षे हा प्रकल्प राबविण्यात आला होता.
आजही चला साधू या निसर्गाशी मैत्री हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला. डॉल्फिन’ ग्रुपचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे, कार्याध्यक्ष अदिती कुंभोजकर, उपाध्यक्ष मिलिंद सूर्यवंशी, अर्चना ऐनापुरे, शुभम भोकरे यांनी या प्रकल्पाचे संयोजन केले तर यावेळी मनोजकुमार मुळीक, वंदना राजमाने, ड. वंदना यादव, प्रा. बाळासाहेब शितोळे, पूजा यादव, दिनेश पाटील, सुषमा पाटील, नित्या पाटील, वरद राजमाने, पुष्कर मगदूम, प्रवीणकुमार मगदूम, पवन भोकरे आदी उपस्थित होते.
दंडोबा डोंगर परिसर सध्या वन विभागाच्या ताब्यात असून गेल्या दहा वर्षापासून राखीव वन क्षेत्रामुळे तरूण वर्गात एक दिवसाच्या सहलीसाठी प्राधान्याने या परिसराची निवड होत आहे. श्रावण महिन्याच्या तिसर्या सोमवारी या ठिकाणी यात्राही भरते. या यात्रेवेळी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीही येत असतात. तसेच शासनाच्या पर्यटन विकास योजनेतून या ठिकाणी दळणवळणासाठी रस्ताही बांधण्यात आला आहे. मुख्य ठिकाणी वीज, पाणी आणि विश्रांतीगृह यांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे हा परिसर निसर्ग पर्यटनासाठी तरूणांच्या आवडीचे ठिकाण ठरत आहे.