पर्यटन संस्थांची नोंदच नाही; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील साहसी खेळांच्या संस्था आणि पर्यटन संस्थांना क्रीडा विभागाच्या नियमानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे, मात्र अशा प्रकारे कोणत्याही संस्थेची अथवा पर्यटन संस्थेची नोंद झालेली नाही. परिणामी साहसी खेळातील सहभागी आणि पर्यटक यांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसून येते. नुकतेच मुरुड येथे ‘पॅरासेलिंग’ दरम्यान झालेल्या अपघाती मृत्यूनंतर साहसी पर्यटनातील सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जुलै २०१८ मध्ये राज्य क्रीडा विभागाने साहसी खेळांसाठी नियम व मार्गदर्शक सूचना लागू केल्या होत्या. मात्र वर्षभरानंतरदेखील त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहात नसल्याचे राज्याचे क्रीडा संचालनालयाने सांगितले. अध्यादेशानुसार जमिनीवरील, हवेतील आणि पाण्यातील साहसी खेळ व पर्यटन कंपन्यांसाठी नियम व मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात आली आहेत. त्यानुसार अध्यादेशातील नियमांबरोबरच प्रत्येक खेळाच्या राज्य शिखर संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, तसेच पर्यटन कंपन्यांनी देशपातळीवरील शिखर संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. अध्यादेशानुसार हवाई साहसी प्रकारांसाठी नागरी विमान महानिर्देशनालय, तर जल साहसी क्रीडा प्रकारासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाची परवानगी आवश्यक असते. मात्र सध्या तरी हे सर्व साहसी क्रीडा प्रकार आणि पर्यटन या सर्व परवानगीच्या प्रक्रियेला बाजूला सारूनच काम करताना दिसते.

क्रीडा विभागाने यासाठी जिल्हा पातळीवर समितीची रचना केली असून जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. ‘या समितीकडे साहसी खेळांच्या संस्था आणि साहसी पर्यटन कंपन्या दोहोंनी नोंद करणे बंधनकारक आहे. पण याकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहात नाही. नोंदीसाठी कोल्हापूर, सातारा येथून काही जणांनी चौकशी केली होती. मात्र आजवर जिल्हा समितीकडे अशा नोंदी झालेल्या नाहीत. सुरक्षेच्या कारणासाठी अध्यादेशातील साहसी खेळांचे नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अपेक्षित आहे. त्या संदर्भातील संस्थेकडील कागदपत्रांची तपासणी झाल्यावर जिल्हा पातळीवर नोंद केली जाते, पण अशा नोंदी करण्यास कोणी आले नाही,’ असे राज्याच्या क्रीडा संचालनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर मगच या संदर्भात चर्चा सुरू होतात, मात्र पूर्वकाळजी कोणी घेत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मुरुड किनाऱ्यावर जीपच्या साहाय्याने ‘पॅरासेलिंग’ करत असताना दोर तुटून वेदांत पवार (१५ वर्षे) याचा मृत्यू झाला. शासकीय यंत्रणांचे लक्ष नसल्यामुळे जिल्ह्य़ात जीपच्या साहाय्याने पॅरासेलिंगचे प्रकार बिनबोभाटपणे सुरू असतात. ‘या दुर्घटनेनंतर जिल्ह्य़ातील सर्वच ठिकाणचे जलक्रीडा प्रकार बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जीप पॅरासेलिंग्स परवानगीसंदर्भात तपास सुरू आहे,’ असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trekking in india
First published on: 03-06-2019 at 01:50 IST