सोलापूर : तबल्याचे सुखावणारे बोल आणि पखवाजचा घुमावदार नाद तसेच किराणा घराण्याचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या हृदयस्पर्शी गायनाने सोलापूरकर रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली. निमित्त होते विद्यार्थीप्रिय शिक्षक, समाजधुरीण प्रा. श्रीराम पुजारी यांची जन्मशताब्दी वर्षपूर्ती आणि तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांना आदरांजलीचे !
प्रा. श्रीराम पुजारी जन्मशताब्दी आणि पुजारी प्रतिष्ठानच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालय आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात आयोजित कार्यक्रमात जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना आदरांजली वाहण्यासाठी पखवाज आणि तबलावादन जुगलबंदीच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्राची सुरुवात सुखद मुंडे (पखवाज) आणि यशवंत वैष्णव (तबला) यांच्या तबला वादनाने झाली. पखवाजमधून उमटलेले आदितालाचे बोल तर तबल्यातून साकारलेले तीन तालाचे बोल जणू एकमेकांशी संवाद करत असावेत, असा भाव उमटला. देवतांच्या रूपांना पखवाज वादनातून साकारलेल्या ‘धा’च्या बोलांनी वंदन करण्यात आले.
पेशकार, तालविस्तार, ठेकाविस्तार, प्रस्तार, कायदे, तुकडे, मुखडे यांच्यासह पखवाज व तबला वादनातील चक्करदारची पेशकश करण्यात आली. पखवाज वादनातील थुंगावली, क्रधावली यांच्यासह तबला वादनातील ‘क ति ट धा’चे उमटलेले बोल रसिकांना सुखावून गेले. उस्ताद झाकीर हुसेन यांनी रचलेल्या ‘धा गे ति ट, ता गे ति ट’ या बंदिशीने त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. यशवंत वैष्णव यांनी सादर केलेली योगेश समसी यांची रचना तसेच पखवाज वादनाचे वैशिष्ट्य दर्शविणारे वादन रसिकांना विशेष भावले. लहेरा साथ अभिषेक शिनकर यांची होती. तीन युवा प्रतिभावान कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी उभे राहून मानवंदना दिली.
दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित कैवल्यकुमार गुरव (धारवाड) यांचे शास्त्रीय गायन रंगले. त्यांनी मैफलीची सुरुवात राग श्यामकल्याणमधील ‘सखी मोरा मन लागेना’ या बंदिशीने केली. प्रियतमाशिवाय मन लागत नाही, त्यामुळे झालेला विरह दर्शविताना पंडित गुरव यांनी भावस्पर्शी गायन सादर केले. त्यानंतर राग मल्हारमधील ‘घुमड घुमड आए’ तसेच पंडित कुमार गंधर्व यांची ‘पिहरवा अजहून आए’ ही रचना सादर केली.
खास सोलापूरकरांसाठी पंडित गुरव यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत ‘आले वारकरी पंढरीसी’ ही भक्तिरचना सादर करून भावपूर्ण वातावरणाची निर्मिती केली. ‘आयी देखो भोर भयी’ या भैरवीने त्यांनी मैफलीची सांगता केली. उत्तम दमसास, सप्तकात सहज फिरत असलेला आवाज, त्याला रसिकांची मिळालेली उत्स्फूर्त दाद यातून मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. मयंक बेडेकर (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), वज्रकाय कदम, सचिन जाधव, वैष्णवी बरकते (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली.