टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर मनोरंजन क्षेत्रात चांगलीच खळबळ उडालेली आहे. याशिवाय या प्रकरणात दररोज नवीन खुलासेही होत आहेत. तर तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा कथित प्रियकर शिझान खान याला काल अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आता भाजपा आमदार व मंत्र्यांकडून हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय असल्याचा दावा केला जात आहे.

भाजपा नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, “हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही पाहत आहोत की, दिवसेंदिवस ही प्रकरणं वाढतच आहेत आणि आम्ही या विरोधात कडक कायदा आणण्याचा विचार करत आहोत.”

सहायक पोलीस आयुक्त(एसीपी) चंद्रकांत जाधव यांनी सांगितले आहे की, आतापर्यंत कोणत्याही अन्य प्रकाराची, ब्लॅकमेलिंग किंवा लव्ह जिहादबाबत काही ठोस माहिती हाती आलेली नाही. पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे आणि आरोपी शिझान आणि तुनिषाचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत.

हेही वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर

याशिवाय, इंडिया टुडेशी बोलत असताना भाजपा आमदार राम कदम यांनी या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करतील असे मत व्यक्त केलेले आहे. तसेच चौकशीत लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर त्यादृष्टीने देखील सखोल चौकशी होईल, असे म्हटले आहे. लव्ह जिहादच्या मागे कोणती संघटना आहे का? त्यांचे काय षडयंत्र आहे? याचाही तपास पोलिस करतील आणि तुनिषाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील, असे राम कदम यांनी म्हणाले आहेत.

२४ डिसेंबर रोजी दुपारी तुनिषाने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर तिचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तुनिषाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात असले तरी पोलिसांनी तपासाची अधिकृत माहिती दिलेली नाही. शिझान खानची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीसांच्या तपासात काय निष्पन्न होते, हे समोर येईल.