काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम असताना दुसरीकडे भाजपा मात्र आक्रमकपणे त्यांना लक्ष्य करत आहे. शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचं सांगत, यामुळे मविआत फूट पडू शकते असा इशारा दिला आहे. त्यातच आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांसंबंधी एक ट्विट केलं आहे. या ट्वीटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा – गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…

महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती असा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे. “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली,” असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

नेमकं ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?

“सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं,” असा दावा तुषार गांधी यांनी केला आहे.

मी इतिहास सांगितला आहे – तुषार गांधी

दरम्यान तुषार गांधी यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण कोणताही आरोप करत नसून, जे इतिहासात नोंद आहे तेच सांगत असल्याचं ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा – असत्याचे प्रयोग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी आरोप करत नाही आहे. मी जे इतिहासात नमूद आहे तेच सांगितलं आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंद आहे त्यानुसार २६,२७ जानेवारी १९४८ च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले होते. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला आणि तेथून ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरला त्यांनी सावरकवादी असणाऱ्या परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडलं. हेच मी सांगितलं असून, नवीन काही आरोप केलेला नाही,” असं तुषार गांधी म्हणाले आहेत.