संगमनेर: नशेसाठी वापर होणाऱ्या औषधांची खरेदी -विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात उघडकीस आला आहे. अशा नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून नशेसाठी म्हणून वापरल्या जात असलेल्या बाटल्या, इंजेक्शनच्या सिरीज असा २ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अवैध उद्योग धंद्यांमध्ये संगमनेर आता अजिबात मागे राहिले नसल्याचे या कारवाईने समोर आले.
औषध विक्री करणाऱ्या दुकानाचा चालक आदित्य किशोर गुप्ता व चाकण येथील सिद्धेश्वर फटाटे या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नगरपालिका रस्त्यावर, लालबहादूर शास्त्री येथील चौकातील ‘एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेन्ट शॉप’मध्ये एका व्यक्तीकडून नशेसाठी वापरले जाणारे मेफेंटरमाईन सल्फेट हे औषध अवैधरीत्या विकले जात आहे, अशी गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या माहितीची खातरजमा केली.
त्यानंतर त्यांनी एका व्यक्तीला नकली ग्राहक बनवून औषध खरेदी करण्यासाठी दुकानात पाठवत कारवाईसाठी सापळा लावला. पोलिसांची खात्री झाल्यानंतर झडती घेतली असता त्याची दुकानाच्या टेबलावर वरील औषधांच्या ३ बाटल्या आणि ९ इंजेक्शन सिरींजसह एकूण २,२३,१२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्यामध्ये एक मोबाइल फोन आणि दुचाकीचा समावेश आहे. याप्रकरणी आरोपी गुप्ता याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेतील आरोपी गुप्ता हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करू नये म्हणून राजकीय हस्तक्षेप झाला, मात्र अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला. कलमे कमी करण्याच्या दृष्टीने देखील पोलिसांवर दबाव आणण्यात आल्याची चर्चा आहे. यापूर्वी श्रीरामपूर पोलिसांनीही अशाच प्रकारे औषधांचा नशेसाठी वापर होत असणाऱ्या इंजेक्शनचा साठा जप्त केला होता.
नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या बाटल्यांत उत्तेजक द्रव्य आहे. तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी आदित्य गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. त्याने हा साठा चाकण येथील सिद्धेश्वर फटाटे याच्याकडून खरेदी केला होता. त्यामुळे संगमनेर पोलिसांनी चाकण येथे जाऊन फटाटे याला देखील अटक केली आहे. –रवींद्र देशमुख, पोलीस निरीक्षक
