नांदेडवरून जवळाबाजारला येताना मालमोटारीने धडक दिल्याने औंढानागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील पोलीस पाटील व त्यांची पत्नी हे दोघे ठार झाले.
नांदेड येथे मुलाला भेटण्यासाठी पोलीस पाटील शेख अफसर शेख इसाख (वय ७०) व त्यांची पत्नी  नईम सुलताना (वय ६०) हे दोघे गेले होते. रविवारी सकाळी मोटारीने (क्र. एमएच१५ २३१३) जवळाबाजारकडे येताना सकाळी ७.३० च्या सुमारास किन्हाळा पाटीजवळ त्यांच्या मोटारीला मालमोटारीने (क्र. पीबी३२-९२९७) धडक दिली. या धडकेत पोलीस पाटील शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी नईम सुलताना गंभीर जखमी झाल्याने औषधोपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची कुरुंदा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.