उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील ४२ वर्षीय व्यक्तीसह त्याच्या १६ वर्षीय मुलास ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे . बुधवारी सायंकाळी यासंदर्भातील माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेतील सूत्रांकडून मिळाली आहे.

संबंधित व्यक्ती व त्याचे कुटुंबीय हे नुकतेच विदेशवारी करून आलेले आहेत. गुंतवणुकीचा व्यवसाय करणारा ही व्यक्ती दुबईतील शारजाह येथून परतली आहे. विमानतळावरच त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आली. मात्र, त्यानंतर गावी आल्यानंतर पुन्हा एकदा केलेल्या चाचणीत त्यांच्यात करोनाची लक्षणे आढळून आली.

यामुळे त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचीही चाचणी करण्यात आली. यामध्ये संबंधित व्यक्ती व त्याच्या मुलाचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला असून दोघांमध्येही ओमायक्रॉनची लक्षणे आढळून आली आहेत.

राज्यात आज आणखी चार ‘ओमायक्रॉन’बाधित आढळले आहेत. या चार ‘ओमायक्रॉन’बाधित रुग्णांमध्ये उस्मानाबादमधील दोन जण, मुंबईमध्ये एक आणि बुलडाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या आता ३२ वर पोहचली आहे. आज आढळलेल्या चार रुग्णांमध्ये तीन पुरूष व एक महिला आहे.

Omicron : राज्यात आणखी चार ‘ओमायक्रॉन’बाधित आढळले ; आतापर्यंत ३२ जणांना संसर्ग!

आजपर्यंत आढळलेल्या ३२ ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबई-१३, पिंपरी चिंचवड-१०, पुणे – २, उस्मानाबाद -२, कल्याण डोंबिवली -१, नागपूर-१, लातूर-१,वसई विरार -१ आणि बुलडाणा -१ अशी रूग्ण संख्या आहे. यापैकी २५ जणांना त्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून सुट्टी देखील देण्यात आलेली आहे.