शहरातील बशीर कॉलनी भागातील जटवाडा भागात एका स्टील कॅरियर तयार करणाऱ्या गॅरेजमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात २ ठार तर सात जण जखमी झाले आहेत.
सायंकाळी साडेसात वाजता हा स्फोट झाला. तो इतका शक्तिशाली होता की, गॅरेजचे पत्रे उडाले. मृतांपैकी एक जण तीन वर्षांचा, तर एक तीस वर्षांचा आहे. त्यांची ओळख पटलेली नाही. वाजीद खान, शेख युसूफ अहमद, महंमद अकबर, विजू रमण, विकास रमण पवार, महंमद फारूख, शिराज महंमद अशी जखमींची नावे आहेत. सात जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा स्फोट गॅरेजमधील गॅस सिलिंडरमध्ये झाल्याचे समजते. स्फोटाचे कारण मात्र समजू शकले नाही.