लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला  शहरात करोनामुळे रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शहरातील आणखी दोन रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. दोन रुग्णांचा १९ मे रोजी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३ जणांचे मृत्यू झाले आहेत. शहरात शुक्रवारी आठ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३४९ वर पोहोचली. सध्या १२० करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला शहरात करोनाचा प्रकोप कायम असून, रुग्ण संख्या वाढीसह मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. शुक्रवारच्या सकाळच्या अहवालानुसार आणखी दोन मृत्यू आणि आठ नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण ९२ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ८४ अहवाल नकारात्मक, तर आठ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३४९ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील २३ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २०६ जणांनी करोनावर मात केली.

सद्यस्थितीत १२० करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, १९ मे रोजी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते त्याच दिवशी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला. त्यातील एक रुग्ण ५० वर्षीय महिला असून, ती नायगाव येथील रहिवासी आहे, तर दुसरा मृत रुग्ण ५२ वर्षीय पुरुष असून, बाळापूर मार्ग अकोला येथील रहिवासी होते. आज सकाळच्या अहवालानुसार सकारात्मक आलेल्या रुग्णांमध्ये तीन महिला व पाच पुरुष आहेत. यामध्ये दोन मृतांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांमध्ये दोन फिरदोस कॉलनी, तर आंबेडकर नगर, गोकूळ कॉलनी, मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर व बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे.

भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आली होती. गावात आल्यापासून ही महिला जि.प.शाळेतील विलगीकरण कक्षातच होती. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी आरोग्य तपासणी सुरू आहे. रुग्ण व मृत्यू संख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

१५ जणांना रुग्णालयातून सुटी
आतापर्यंत जिल्ह्यातील २०६ जण करोनातून बरे झाले आहेत. गुरुवारी रात्री १५ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यातील १० जण कोविड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत, तर पाच जणांना घरी सोडण्यात आले. शहरातील वेगवेगळ्या भागातील ते रहिवासी आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two more deaths in akola now 349 corona patients in the district scj
First published on: 22-05-2020 at 12:35 IST