लोकसभा निवडणुकीची लढत दिवसेंदिवस रंगत जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जंगी सामना होणार आहे. दोन्ही आघाड्यांमधून उमेदवार एकमेकांविरोधात ठाकले आहेत. त्यामुळे यंदा सत्तांतर होणार की पुन्हा तेच सरकार सत्तेत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, यावरून दोन्ही आघाड्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (७ एप्रिल) नागपुरात होते. महायुतीतील उमेदवारांचे अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, विदर्भात महायुतीचं अतिशय चांगलं वातावरण आहे. मी रामटेकच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरायलाही गेलो होतो. गडकरींचाही अर्ज भरायला गेलो होतो. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातील सर्व जागा महायुती जिंकेल. अशा प्रकारचं वातावरण या भागात आहे. रामटेक, यवतमाळ-वाशिम हे दोन्ही मतदारसंघ, मोठ्या फरकाने बहुमताने महायुतीचे होतील.

हेही वाचा >> मोठी बातमी! एकनाथ खडसे स्वगृही परतणार, भाजपा प्रवेशाबाबत दिली माहिती; म्हणाले…

काँग्रेसची काय अवस्था झाली याचा विचार करा

एकनाथ शिंदे गटाने त्याग करू नये, आधीच सहा जागा गमावल्या आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, पदाधिकाऱ्यांच्या बैठका निवडणूक काळात सातत्याने होत असतात. आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवत आहोत. निवडणूक काळात ग्रासरुट लेव्हलला काम करायंच असतं. फक्त घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत. प्रत्यक्ष फिल्डवर जावं लागतं. नेते, उपमुख्यमंत्री, सर्व कार्यकर्त्यांसह जावं लागतं. त्यामुळे महायुतीकडे आज दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय जळंतय ते पाहावं. महाविकास आघाडी म्हणजे तीन तिघाडा आणि काम बिघाडा आहे. दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडाही नाही आणि झेंडाही नाही, अशा लोकांनी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची काय अवस्था केली आहे याचा विचार करावा”, असा टोलाही त्यांनी लगावला.