चंद्रपूर : सध्याचा काळ हा इंटरनेटचा असल्याने ‘फेसबुक’च्या माध्यमातून मंगेश व प्रतिभा या दोन मूकबधिर जीवांनी जन्मोजन्मासाठी एकत्र येण्याकरिता केलेल्या प्रयत्नाला दोन वर्षांनंतर १० फेब्रुवारीला यश आले. येथील प्रसिद्ध गवराळा गणेश मंदिराच्या परिसरातील सूर्यमुखी हनुमान मंदिरात विवाह सोहोळा पार पडला. यावेळी मुलाच्या आई-वडिलांसह, भाऊ तथा आप्तस्वकीय उपस्थित होते. जागतिक प्रेमदिनाच्या आठवडय़ात हा दिवस या दाम्पत्यांच्या आयुष्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झिंगूजी वार्डात राहणारा मंगेश तुकाराम मांढरे (३५) हा जन्मताच मूकबधिर आहे. त्याचे मूकबधिर विद्यालय नागपूर येथे बारावीपर्यंत शिक्षण झाले. नोकरीसाठी प्रयत्न करीत असताना तो वडिलोपार्जित शेतावर काम करू लागला. लग्नाचे वय झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी मुली पाहणे सुरू केले. परंतु मंगेश याने माझ्यासारखीच मूकबधिर अर्धागीनी पाहिजे, असा अट्टाहास धरला. त्यामुळे समाजात आणि जवळपास अशी मुलगी मिळणे शक्य नव्हते. त्यातच स्मार्ट फोनच्या माध्यमातून मंगेशने मूकबधिर फेसबुकच्या माध्यमातून छत्तीसगड राज्यातील कोरबा बाल्कोनगरमधील ३२ वर्षीय प्रतिभा हिमांचलकुमार बन्जारे या मूकबधिर युवतीशी संपर्क झाला. त्याने आपल्या विवाहाबद्दल तिच्याकडे फेसबुकवर भावना व्यक्त केल्या. त्याला तिनेही दुजोरा दिला. तिने ही बाब वडील हिमांचलकुमार तथा कुटुंबीयांना सांगितली. तिच्या वडिलांनी येथे प्रत्यक्ष येऊन भेट दिली. परंतु लांबचे अंतर असल्यामुळे त्यांनी मुलीला भद्रावती येथे देण्यास स्पष्ट नकार दिला. परंतु फेसबुकवरून दोघांमध्ये निर्माण झालेले प्रेमसंबंध दोघांनाही स्वस्थ बसू देत नव्हते. ‘व्हिडीओ कॉलिंग’, तथा इतर माध्यमातून तसेच मूकबधिरांच्या सांकेतिक भाषेतून त्यांचे बोलणे सुरूच होते. दरम्यान, प्रतिभा ही घरी आपल्या बहिणीला सांगून एकटीच रेल्वेने रायपूर मार्गे गोंदियावरून चंद्रपूरला आली व ९ फेब्रुवारी रोजी भद्रावतीला पोहोचली. मंगेशच्या घरी थेट पोहचल्याने कुटुंबीय घाबरले. मात्र त्यानंतर भद्रावती पोलीस ठाण्यात जाऊन स्वत:च्या मर्जीने आल्याचे सांगितले. ही बाब मंगेशच्या वडिलांनी प्रतिभाच्या वडिलांना सांगितली. त्यांनी सुद्धा बालकोनगर पोलिसात प्रतिभा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, १० फेब्रुवारीला तिच्या कुटुंबीयांच्या सहमतीने गवराळा गणेश मंदिर परिसरातील सूर्यमुखी मंदिरात विवाह पार पडला. विशेष म्हणजे, ९६ वर्षीय मंगेशचे आजोबा बुधाजी मांढरे मूकबधिर दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी स्वत: हजर होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two silent marriage bonds facebook social media akp
First published on: 14-02-2020 at 01:53 IST