भंडारा : वाघाचे तीन बछडे मृतावस्थेत सापडल्यानंतर तिथेच आढळले वाघिणीसह दोन नवीन बछडे!

एका वाघिणीसह दोन बछडे वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत!

tiger calves found in bhandara forest area

भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळल्यानंतर आता जिल्ह्यातील नाकाडोंगरी वनक्षेत्रात वाघिणीसह दोन बछड्यांचे अस्तित्त्व आढळून आले आहे. विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये त्यांचे छायाचित्र आले असून त्यांच्या संरक्षणासाठी विभाग सज्ज झाला आहे. भंडारा वनविभागाअंतर्गत ज्या पद्धतीने तीन बछडे मृत पावले त्यानंतर वनविभाग अधिक जागृत झाला आहे. नाकाडोंगरी वनक्षेत्रात डोंगरीमाईन, चिखलामाईन हे मँगनिज क्षेत्र आहे. त्याला लागूनच चिखला बीट असून त्याठिकाणी वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचे अस्तित्त्व आढळले. त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आला होता आणि पहिल्यांदा वाघीण व तिच्या दोन बछड्यांचे छायाचित्र तिथे आढळले.

चार ते पाच महिन्यांचे बछडे!

पेंच-नागझिऱ्याचा हा कॉरिडॉर आहे. तुमसर आणि मोहाडी तालुका मिळून वनविभागाची चार वनक्षेत्र आहेत. यात तुमसर, नाकाडोंगरी, लेंडेझरी, जामकांजरी या क्षेत्रांचा समावेश आहे. या जंगलात मध्यप्रदेशातून स्थलांतरीत होऊन आलेले अनेक वाघ आहेत. वन्यजीवांची संख्या येथे चांगली असून मागील महिन्यातच कॅमेरा ट्रॅपच्या अभ्यासात ही माहिती मिळाली होती. चार ते पाच महिन्यांचे हे बछडे आहेत. मागील वर्षी याच परिसरात अवैध शिकारीचे प्रकरण उघडकीस आले होते. वीजप्रवाह लावून शिकार करणारी टोळी पकडण्यात आली होती. याच चिखला बीटला लागून ते असल्याने आता वाघीण आणि तिच्या बछड्यांच्या संरक्षणाची जबाबदारी वनखात्यावर आहे.

वाचा सविस्तर – एकाच दिवशी वाघाचे तीन बछडे मृतावस्थेत!

वनखाते झाले सतर्क!

“शिकारीच्या घटनेनंतर प्रादेशिक वनखात्याचे मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार यांनी या विभागाचा दौरा केला. त्याचवेळी त्यांनी भंडारा उपवनसंरक्षकांना काही निर्देशही दिले होते. वाघीण आणि बछड्यांचे अस्तित्त्व असल्यास ते सर्वांना सांगा, ज्यामुळे त्याचे संरक्षण करता येईल. चांगल्या गोष्टी समोर आणण्यासह चुकीच्या होणाऱ्या गोष्टींवरही लक्ष ठेवण्यास आणि वन्यजीव संपत्तीचे संरक्षण करण्यास त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी घडलेल्या वाघांच्या तीन बछड्यांच्या मृत्यूनंतर या दोन बछड्यांच्या संरक्षणाची जबाबदारी निश्चितपणे पार पाडली जाईल”, अशी माहिती भंडाऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two tiger calves found in bhandara nakadongari forest area pmw

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या