वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात एकलहरेजवळील नाल्यात वाहून गेलेल्या तीनपैकी दोन महिलांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले.
एकलहरेलगतच्या गंगापाडळी येथे रविवारी रात्री एका नाल्याला आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील विठाबाई गणपत वलवे (६०), भागिरथीबाई दत्तू वलवे (५५), उषाताई बाळासाहेब वलवे (२८) या महिला वाहून गेल्या होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या इतर महिलांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, कोणाची मदत मिळू शकली नाही. मग, त्यांनी कसेबसे गावात धाव घेऊन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी नाशिकरोड पोलीस ठाणे व नाशिक येथील अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. हा नाला पुढे गोदावरी नदीला मिळतो. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले.
 परंतु, पाऊस व अंधारामुळे त्यांना रात्री शोधकार्य थांबवावे लागले. सोमवारी पहाटे पुन्हा बोटीच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. गंगा पाडळीपासून शंभर ते दीडशे फूट अंतरावर गोदापात्रात भागिरथीबाई वलवे व विठाबाई वलवे यांचे मृतदेह मिळून आले. उषाताई वलवे यांचा शोध अद्याप लागू शकला नसल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, टाकळी परिसरातील नासर्डी नदीत एका बालिकेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाने धाव घेऊन तो बाहेर काढला.