परभणी : दररोजप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी चालत गेलेल्या दोन महिलांना भरधाव वेगातील कारने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गंगाखेड – परभणी रस्त्यावरील माळसोन्ना गोलाई परिसरात गुरुवारी (दि. ७) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

दैठणा येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव कच्छवे हे रोजच्या प्रमाणे गंगाखेड रस्त्यावर सकाळी फिरण्यासाठी गेले होते. पत्नी पुष्पाबाई कच्छवे आणि त्यांच्यासोबत अंजनाबाई शिसोदे होत्या. मात्र, उत्तमराव कच्छवे हे पुढे निघून गेले आणि या दोन्ही महिला मागे काही अंतरावर राहिल्या. माळसोन्ना गोलाई परिसरात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव कारने पुष्पाबाई कच्छवे आणि अंजनाबाई शिसोदे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही महिलांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज आल्यानंतर उत्तमराव कच्छवे यांनी मागे जात लगोलग घटनास्थळ गाठले.

दरम्यान, उत्तमराव कच्छवे यांनी सकाळच्या फेरीसाठी आलेल्या अन्य नागरिकांना ही माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी दैठणा पोलिसांना घटनेची माहिती दिली असता सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, पोलीस अंमलदार तानाजी शिसोदे, विठ्ठल कुकडे, सोनू मोरे आदींनी घटनास्थळी येत मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. याप्रकरणी किशन दिगंबरराव कच्छवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध दैठणा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.