दोन महिला ठार, पाच जखमी
नातेवाईकाच्या अन्त्यविधीसाठी निघालेल्या प्रवासी गाडीवर ट्रक आदळल्याने झालेल्या अपघातात गाडीतील दोन महिला जागीच ठार झाल्या, तर पाच जण जखमी झाले.
या अपघातात विजया विजय पांचाळ (वय ५० वष्रे) व शांती रामचंद्र पांचाळ (वय ४० वष्रे, दोघीही रा. येगाव, चिपळूण) यांचा मृत्यू ओढवला असून रसिका रामचंद्र पांचाळ, शैलेश गणेश जोंधळे, सुधीर अनंत पांचाळ, संतोष बाळकृष्ण पांचाळ आणि सत्यवान सुनील पांचाळ (सर्व जण रा. येगाव, चिपळूण) जखमी झाले आहेत. या प्रवासी गाडीचा चालक रुपेश मयेकर हाही अपघातातून बचावला. मुंबई-गोवे महामार्गावर संगमेश्वरजवळ माभळे येथे झालेल्या या अपघाताबाबत पोलिसांनी सांगितले की, चिपळूण तालुक्यातील येगाव येथील पांचाळ कुटुंबीय त्यांच्या नातेवाईकाच्या अन्त्यविधीसाठी सोमवारी सकाळी ट्रॅक्स गाडीतून बावनदीला निघाले होते. वाटेत मृत नातेवाईकासाठी पुष्पहार घेण्यासाठी संगमेश्वरचा सोनवी पूल ओलांडून या प्रवाशांनी गाडी थांबवली आणि त्यांच्यापैकी महेंद्र पांचाळ हार आणण्यासाठी संगमेश्वर एसटी स्टॅण्डकडे गेले. याच सुमारास मुंबईहून ट्रक घेऊन निघालेल्या चालक बालाजी पवार (वय ३५, रा. मुंबई) याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पांचाळ कुटुंबीयांच्या गाडीला वाचवण्यासाठी ट्रक दुसऱ्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा ताबा सुटून ट्रक ट्रॅक्स गाडीवर कोसळला आणि आतील सर्व प्रवासी त्याखाली अडकून पडले. अपघात झाल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ, दुकानदार, रिक्षाचालक आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी धावले. ट्रकमध्ये असलेली आटय़ाची पोती बाजूला काढून ट्रॅक्समध्ये अडकलेले प्रवासी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.
सुमारे अध्र्या तासानंतर पहिल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश आले. पण अवजड ट्रक ट्रॅक्सवर आडवा पडला असल्याने इतर प्रवासी आतमध्येच अडकले होते. अखेर जेसीबीच्या साहाय्याने ट्रक आणखी बाजूला घेऊन आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यांपैकी दोन महिलांचा गाडीतच मृत्यू ओढवला. जखमी पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी बचावासाठी धावलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ट्रकचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. तसेच ट्रकमध्ये आणखी काही मद्य व शीतपेयाच्या बाटल्या होत्या. अपघात झाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two women killed in road accident
First published on: 05-04-2016 at 00:40 IST