गडचिरोलीतील महादवाडी व कुराडी जंगलात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन महिला ठार झाल्या. दोन्ही घटना आज सोमवारी सकाळच्या आहेत. या घटनेमुळे भीती व दहशतीचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मे महिन्याच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात तेंदुपत्ता तोडायचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील स्थानिक मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ता तोडण्याच्या कामी जंगलात सकाळपासूनच जात आहेत. आज सोमवारी पोर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महादवाडी व कुराडी या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक तेंदूपत्ता सोडण्याकरिता गेले होते. यात पहिली घटना महादवाडी जंगलात सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. महादवाडी येथील कल्पना दिलीप चौधरी (३७)ही महिला सहकाऱ्यांसमवेत तेंदूपत्ता तोडण्याचे कामात मग्न असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात कल्पना जागीच मरण पावली. वाघाचा हल्ला होताच तिने किंकाळी फोडली, लगेच आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे वाघ तिथून पळून गेला. दुसरी घटना महादवाडीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर कुराडी गावालगतच्या जंगलात सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली यात सिंधुबाई दिवाकर मुनघाटे (५६)या महिलेचा मृत्यू झाला.

हल्ला करणारे दोन्ही वाघ दीड ते दोन वर्षे वयाचे होते. घटनेची माहिती मिळताच पोला वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी पाठविले असून, मृतकांच्या कुटुंबीयांना तत्काळ दहा हजार रुपये सानुग्रह सहाय्यता केली आहे. नियमानुसार वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे कळते. दरम्यान वनविभागाने गडचिरोली परिसरात वाघांचा वावर असल्याचे सांगत नागरिकांनी जंगलात जाऊ नये असे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two women killed in tiger attack an atmosphere of terror among the citizens msr
First published on: 10-05-2021 at 17:20 IST