रत्नागिरी– रत्नागिरीतील विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच येथील विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुले होणार आहे. याबरोबर रत्नागिरी फ्लाईंग क्लबची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
ते म्हणाले, रत्नागिरीकरांच्या भाग्याचा क्षण येत्या सहा सात महिन्यानंतर येणार आहे. माल व प्रवासी वाहतुकीसाठी येथील विमानतळ सज्ज असणार आहे. यामुळे माझ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा, मुलगी किंवा तिचे आई-बाबा दोन हजार रुपयांमध्ये विमानात बसून मुंबईला जाणार आहेत. त्यामुळे लवकरच रत्नागिरीचे हे विमानतळ सुरु होणार आहे. ज्यावेळी हे विमानतळ सुरू होईल, तेव्हा माझा रत्नागिरीतला बांधव किंवा भगिनीला पायलट व्हायचे असेल तर त्यांना मुंबईला जायची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी रत्नागिरीतच फ्लाईंग क्लब काढला जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, याबाबत आपण आश्वासन दिले होते. त्याची मूहर्तमेढ देखील मुंबईत रोवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते महसूल विभाग सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सेवा दूत ही सेवा घरपोच देण्याचा उपक्रम, ई-तक्रार निवारण प्रणाली आणि ई – संदर्भ पोर्टल या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कळ दाबून पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यामधल्या नागरिकाला, ग्रामस्थाला पंधरा दिवस सुखी ठेवण्यापेक्षा वर्षाचे ३६५ दिवस जर आपण त्याला सुखी ठेवले तर खऱ्या अर्थाने आपण शासनाला अपेक्षित असलेले काम करतोय अशा पद्धतीचे चित्र एक वेगळा आदर्श म्हणून राज्यात जाईल. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे स्वागत हसत करावे. माझ्याबरोबर हसून बोलले, मला त्यांनी सन्मान दिला, मला त्यांनी आदर दिला, असा संदेश जनतेत गेला पाहिजे, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
यावेळी प्रातांधिकारी जीवन देसाई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्ज्वलन करण्यात आले. शिधा पत्रिका, वय अधिवास दाखला, रहिवास दाखला, जातीचा दाखला प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.