रत्नागिरी : बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पोलीस बळाचा वापर करून प्रकल्प रेटवून नेण्याचा प्रयत्न न करता स्थानिकांशी संवाद साधून पुढील निर्णय घेतला जाईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी जाहीर केले. गेले चार दिवस बारसू परिसरातील घडामोडींचा सामंत यांनी शनिवारी जिल्हाधिकारी देवेंद सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, या परिसरात मातीसाठी ड्रिलिंगचे काम येत्या ९ ते १० दिवसांत पूर्ण होईल. ही माती जागतिक पातळीवरील कंपनीकडे तपासणीसाठी पाठवली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांच्याकडून माती परीक्षणाच्या अहवालानंतरच प्रकल्प होणार की नाही ते ठरणार आहे. मात्र या विषयावर सर्व संबंधितांशी चर्चा करून सामोपचाराने तोडगा काढण्याचे शासनाचे धोरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना त्रास देण्याचा कोणताही प्रयत्न नाही. संयमाने चर्चेतून हा विषय हाताळण्याचा आमचा प्रयत्न आहे. या परिसरात  झालेल्या जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांच्या तक्रारींबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमून याची चौकशी केली जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant asserted barsu project will decide after interacting with the locals ysh
First published on: 30-04-2023 at 00:02 IST