चिपळूण: रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत चिपळूण दौऱ्यावर आले असता लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कार्यक्रमानिमित्त त्यांची माजी आमदार रमेश कदम यांच्याबरोबर भेट झाली. लोटिस्माच्या कार्यक्रमात त्यांनी कदमांचे तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे सामंत यांनी कोकणात सुरू केलेल्या ऑपरेशन टायगरचे पुढील टार्गेट रमेश कदम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी मध्यंतरी सुरू केलेल्या ऑपरेशन टायगरची चर्चा राज्यात रंगली होती. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी, दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचा त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून घेतला. चिपळूणमध्ये ठाकरे गटाला गळती लागली आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. मात्र आमदार भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्यात मतदार संघाचे राजकारण फिरवण्याची ताकद आहे. त्यामुळे या दोघांमधील एक मोहरा फोडण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. पालकमंत्री सामंत चिपळुणात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी माजी आमदार रमेश कदम यांचे तोंड भरून कौतुक केले.
आपण आपल्या राजकीय जीवनाच्या प्रारंभीच्या व युवा काळामध्ये रमेश कदमांचे कसे मार्गदर्शन घेत होतो आणि कदमांनी आपल्याला कसे सहकार्य केले हे त्यांनी आवर्जून सांगितले. पालकमंत्री बनण्यासाठी रमेश कदम यांनीच शब्द टाकला होता. म्हणूनच मी पहिल्यांदा पालकमंत्री बनलो असा गौप्यस्फोट त्यांनी केला. रमेश कदम म्हणजे संघर्ष, परंतु भाईंनी मला राजकीय मदत केली, त्यावेळी असा विचार केला नाही की, हा मुलगा पुढे जाऊन आपल्यापेक्षा मोठा होईल. कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता त्यांनी कामे केली. एक काळ चिपळूण तालुका त्यांच्या शब्दावर डोलायचा आणि जिल्हा हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली रहायचा अशी ही पुस्तीही सामंत यांनी जोडली. एकूणच सामंत यांनी कदमांचे गोडवे गायिल्यामुळे त्यांच्या ऑपरेशन टायगरचा पुढचे टार्गेट रमेश कदम असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उदय सामंत त्यांच्या कर्तुत्वावर मंत्री झाले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना मंत्री बनविण्याचे ठरवले होते. मी केवळ निमित्त मात्र आहे. सध्यातरी मी शरद पवार यांच्याबरोबरच आहे. पक्ष सोडण्याचा कुठेही निर्णय घेतलेला नाही. – रमेश कदम, माजी आमदार चिपळूण.