Uday Samant on Bhaskar Jadhav Statement : शिवसेना (ठाकरे) पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जे पदाधिकारी काम करीत नाहीत, ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना दुसरे पद दिले जाते. त्यांना पदावरून हटविण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी ही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, त्यांच्या या विधानावर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“कदाचित आमच्यावर जे प्रसंग उभे राहिले ते भास्कर जाधवांवर उभे राहिले नसतील. त्यांना त्याचा अनुभव आला नसेल. त्यामुळे त्यांना वाटत असेल की जे काही चाललंय ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चाललंय. शेवटी एक्स्ट्रीम टोक येतं, जेव्हा आपल्याला खात्री होते की इथं काँग्रेसचंच ऐकलं जातं किंवा काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष चालवला जातो, त्यामुळे भास्कर जाधवांचं हे मत बनलं असावं”, असं उदय सामंत म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा >> काम न करणाऱ्यांवर कारवाईची हिंमत नाही ! शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली! भास्कर जाधव यांचा ठाकरेंना घरचा आहेर

भास्कर जाधवांना पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारला असता उदय सामंत म्हणाले, “ते येण्याचं किंवा न येण्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. पण भास्कर जाधव यांच्यासारख्या मोठ्या नेतृत्त्वाचं मार्गदर्शन आम्हाला एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली मिळणार असेल तर आम्हाला आनंद आहे.”

भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले होते?

शाखाप्रमुख वगैरे पदांचा कालावधी निश्चित केला पाहिजे. तरच त्यांच्यामध्ये काम करण्याची स्पर्धा लागेल. काही पदाधिकारी दहा-दहा पंधरा-पंधरा वर्षांपासून एका जागेवर बसलेले आहेत. माझ्या पदाला कुणी हात लावू शकत नाही, असता त्यांचा समज झालेला आहे. मी कुठल्यातरी नेत्याची मर्जी सांभाळली की, माझे पद शाबूत. त्यांना पदावरून बाजूला करण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही. ते नाराज होऊ नये म्हणून त्यांना दुसरे पद दिले जाते. पूर्वी पक्षाचा कार्यक्रम असला की शाखाप्रमुखाच्या अंगात अंगार संचारायचा, आज शाखाप्रमुख कोण आहेत, किती आहेत, कुठे आहेत, याचा आढावा घ्यायला लागेल, असे भास्कर जाधव म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करा, असा सल्ला भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांना दिला आहे. निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखापासून सर्वांच्या नावाने फर्मान काढावे लागतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत, अशी नाराजीनही त्यांनी व्यक्त केली.