शिंदे गटाचे नेते आणि महाडचे आमदार भरत गोगावले राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशासाठी आतूर आहेत. अलिकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात गोगावले यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती. परंतु, त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीचे इतर आठ आमदार मंत्री झाले. परंतु, गोगावले यांना मंत्रीपद मिळालं नाही. तसेच शिवसेनेच्या शिंदे गटातील किंवा भारतीय जनता पार्टीमधल्या कोणत्याही आमदाराला नव्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं नाही.

मंत्रीपद न मिळाल्याने भरत गोगावले यांनी त्यांच्या मनातली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. “छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे आमच्यासारख्यांच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले,” असं वक्तव्य करून गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर भरत गोगावले यांना नक्कीच मंत्रीपद मिळेल, असा दावा केला जात आहे. परंतु, मंत्रिमंडळ विस्ताराच्या आशा आता मंदावल्या आहेत.

आपल्याला मंत्रीपद मिळावं अशी भरत गोगावले यांची इच्छा आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक आमदार, मंत्री आणि भरत गोगावलेंचे समर्थक नेते-पदाधिकाऱ्यांचीही तशीच इच्छा आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीदेखील ही इच्छा बोलून दाखवली आहे. उदय सामंत म्हणाले, भरत गोगावले मंत्री झाले पाहिजेत ही माझीही प्रामाणिक इच्छा आहे आणि तो योग लवकरच येईल.

हे ही वाचा >> सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या Aditya-L1 बाबत मोठी अपडेट, ISRO चा दुसऱ्यांदा मोठा पराक्रम, एका महिन्यात ‘इतकं’ अंतर पार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदय सामंत म्हणाले, भरत गोगावले हे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. त्यांचं मन खूप मोठं आहे, हे अनेकवेळा आम्ही सांगितलं आहे. ते आमचे मुख्य प्रतोददेखील आहेत. भरत गोगावले मंत्री नसले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. आम्ही जरी मंत्री असलो तरी गोगावले स्वतः मंत्री असल्यासारखेच आमच्याकडून कामं करून घेतात. परंतु, ते मंत्री झाले पाहिजेत ही माझीदेखील प्रामाणिक इच्छा आहे आणि तो योग लवकरच येईल.