सातारा जिल्ह्य़ातील लोणंद येथील एका उद्योगाच्या व्यवस्थापकाकडे खंडणीची मागणी करून मारहाण केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १२ जणांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील नऊ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची सोमवापर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान या प्रकरणी न्यायालयाने उदयनराजेंना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
लोणंद (ता खंडाळा ) येथे सोना एलाईज नावाचा लोखंडाच्या भुकटीपासून विटा तयार करण्याचा कारखाना आहे. या कंपनीत मागील अनेक महिन्यांपासून कामगारांच्या वेतनवाढी वरून आंदोलन सुरू आहे. या कंपनीत उदयनराजे भोसलेंच्या नेतृत्वाखाली कामगारांची संघटना आहे. या कंपनीचे अधिकारी जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना १८ फेब्रुवारी रोजी सातारा विश्रामगृहात बोलावून खंडणीची मागणी करत मारहाण केली. त्यांच्याकडील काही ऐवज काढून घेतला अशी तक्रार त्यांनी आज सातारा पोलीस ठाण्यात दिली. यानंतर उदयनराजे आणि साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार अशोक सावंत, रणजित माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनावले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल आणि अन्य एक अशा नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची सोमवापर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तर उदयनराजेंनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला आहे. याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावतीने लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट केली जाईल असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
रामराजे – उदयनराजे यांच्यातील संघर्ष
या कंपनीत उदयनराजे आणि रामराजे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या दोन संघटना आहेत. यातील रामराजेंच्या कामगार संघटनेतील कामगारांना जादा काम दिले जाते तर उदयनराजेंच्या संघटनेतील कामगारांना कमी काम दिले जाते. यावरून उदयनराजेंनी १८ फेब्रुवारीला कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतले होते. यावेळी उदयनराजे व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याची तक्रार जैन यांनी दाखल केली आहे.