लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा संसदेची दारे खुणावू लागली आहेत. या महिन्याच्या अखेरीस राज्यसभा सदस्यत्वासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपाने उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत उदयनराजे भोसले यांचंही नाव आहे. या शिवाय भाजपानं महाराष्ट्रातून आरपीआय(ए)चे नेते रामदास आठवले यांनाही उमेदवारी दिली आहे. २६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपानं बुधवारी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात मित्र पक्षांच्या दोन उमेदवारांसह एकूण ११ जणांची नावं आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचंही नाव त्यात आहे. BJP announces the names of party's candidates for the upcoming election to the Rajya Sabha. pic.twitter.com/FAjziadv2Q — ANI (@ANI) March 11, 2020 अशी आहे यादी भाजपाने बुधवारी नऊ राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये असाम (भुवनेश्वर कालीता), बिहार (विवेक ठाकूर), गुजरात (अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा), झारखंड (दीपक प्रकाश), मणिपूर (लिएसेंबा महाराजा), मध्य प्रदेश (ज्योतिरादित्य शिंदे, हर्ष सिंह चौहान), महाराष्ट्रातून (उदयनराजे भोसले, रामदास आठवले), राजस्थान (राजेंद्र गहलोत) यांचा समावेश आहे.