मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलेलं दिसत आहे. आरक्षणासंदर्भात न्यायलायने स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. आता फडणवीस यांच्या समर्थनार्थ राज्यसभेतील भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले मैदानात उतरले आहेत. या वादाचा जातीशी काही संबंध नसल्याचे वक्तव्य उदयनराजेंनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राह्मण असल्याने फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत असा आरोप केला जातोय यावर तुम्ही काय सांगाल असा प्रश्न उदयनराजे यांना विचारण्यात आला. टीव्ही ९ मराठीच्या पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे यांनी देवेंद्र माझा खास मित्र असून या प्रकरणाचा जातीशी काही संबंध नसल्याचे मत व्यक्त केलं. “मुख्यमंत्री, पंतप्रधान यासाठी पद असतात. लोकांनी निवडूण दिलं तर तुम्ही त्या पदावर बसता. आज देवेंद्र माझा खास मित्र आहे. त्याचं बिचाऱ्याचं काय चुकलं? त्याचं काय चुकलं तुम्हीच मला सांगा?,” असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “त्याचं नाव पाटील, जाधव असतं तर कुणीच काही बोललं नसतं. या प्रकरणामध्ये ब्राम्हणचा संबंधच काय आहे. उगीच आपलं काहीतरी. जाता जाता जात नाही ना त्याला जात म्हणतात,”  अशा शब्दांमध्ये या विषयावरुन जातीचे राजकारण करणाऱ्यांना सुनावलं. उदयनराजे यांनी पुढे बोलताना, आपण लोकशाहीमध्ये राहतो तरी लोकं जात पाहून मतदान करत असल्याने चांगले लोकं पदापासून लांब राहतात असंही म्हटलं आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

“जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

मराठा समाजाचं नेतृत्व कोणी करावं यासंबंधी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, “छत्रपती शिवाजी महाराज आपलं आराध्यदैवत आहेत. त्यांच्या वंशजांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात अपार श्रद्धा आहे. त्यामुळे यांच्यात कोणी फूट पाडू नये. कोणी नेतृत्व करावं यासाठी छत्रपतींच्या घरात दोन भाग पडतायत अशी परिस्थिती असू नये. दोघांनी त्याचं नेतृत्व केलं पाहिजे. दोघंही समजूतदार असल्याने वाद होणार नाही आणि कोणी त्यासाठी प्रयत्न करु नये अशी हात जोडून विनंती आहे,” असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosale slams those who talked about devendra fadnavis brahmin caste scsg
First published on: 18-09-2020 at 17:21 IST