Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दहिसर येथील शाखेला भेट दिली. त्यावेळी झालेल्या छोटेखानी भाषणात त्यांनी हिंदुत्वाच्या वाटेत काळी मांजरं येत आहेत असा उल्लेख करत चांगलीच टोलेबाजी करत उपस्थितांना संबोधित केलं. तसंच सगळ्यांना मतदार याद्यांवर लक्ष ठेवा आणि मतचोरी होऊ देऊ नका असंही आवाहन केलं.
स्वतःला वाघ म्हणवणारी काळी मांजरं…
आम्हाला धक्के देणारे अनेक जण आले आणि गेले. धक्का कदाचित बसला असेल पण धोका झालेला नाही. आम्हाला धोका देण्याचा प्रयत्न यानंतरही होईल पण जोपर्यंत तुमची तटबंदी आहे तोपर्यंत धोके देणाऱ्याची डोकी फुटतील बाकी काहीही होणार नाही. आता विघ्नहर्त्याचं आगमन होतं आहे त्याला साक्षी ठेवून मी सांगतो आहे की आम्ही हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन निघालो आहोत. वाटेत स्वतःला वाघ म्हणवणारी काळी मांजरं आडवी येत आहेत. त्या काळ्या, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर नाहीतर आम्ही आहोतच.
पितृपक्ष म्हणजे माझाच पक्ष
मी काही मोठं भाषण करणार नाही. मात्र सगळ्यांनी एक काम नक्की करायचं ते म्हणजे आपल्या वॉर्डात मतचोरी होते आहे का? आता गणपती उत्सव आहे मग पितृपक्ष आहे. पितृपक्ष मी आपलाच मानतो कारण माझा पक्ष हा पितृपक्षच आहे. शिवसेनेची स्थापना माझ्या पित्याने केली आहे. ज्यांचा काही आगापिछा नाही त्यांना सगळ्या चोऱ्या कराव्या लागत आहेत. आजपासूनच मतदार याद्यांची तपासणी सुरु करा. नाहीतर निवडणुकीच्या दिवशी मतदार नाहीत त्यांच्या नावानेही मतदान होतं. डोळ्यांत तेल घालून मतदार याद्या तपासा. ४२ लाख मतदार आपल्या राज्यात घुसवले गेले. ते कोण आहेत बघा, त्यांना मतदान करु देऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मतदार याद्यांबाबत महत्त्वाचं आवाहन
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या हा मुद्दा केंद्रस्थानी येऊ लागला आहे. काल पुण्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. “मतदार याद्यांवर काम करा, नावं व्यवस्थित तपासा,” असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. तर आज दहिसरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील हाच मुद्दा अधोरेखित केला. “घराघरांत जा, मतदार यादी तपासा… कारण आपलं मत चोरी होत आहे. त्यामुळे ही जबाबदारी कार्यकर्त्यांनी गंभीरपणे पार पाडली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंकडून एकाच मुद्द्यावर भर दिला जात असल्याने, पुढील रणधुमाळीत मतदार याद्यांचा विषय मोठ्या चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे.