Uddhav Thackeray : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी १० वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली आहे. राज्यभरातून विविध मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. तसंच ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे का? या प्रश्नावरही उत्तर दिलं.
मराठी बांधव न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाहीत तर मग काय सूरत आणि गुवाहाटीला जाणार का?
मराठी बांधव न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार का? मराठी माणसाची ताकद मराठी द्वेष्ट्यांना दिसते आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलं आहे. आत्तापर्यंत या सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावेळी सांगितलं होतं की त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसांत मराठा समाजाला न्याय दिला असता. दुसरे एक आहेत, त्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आत्तापर्यंत या लोकांना वापरुन फेकण्यात आलं. आपण म्हणतो ना कोपराला गूळ लावण्यात आला, आता हे लोक मुंबईत आले आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन सरकारने त्यांना न्याय दिला पाहिजे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी तुम्हाला मान्य आहे का?
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “आमचं सरकार पाडून तुमचं सरकार आणलंत ना? मग ते कशासाठी? मराठी माणूस न्याय हक्क मागण्यासाठी मुंबईत येणार तसे ते आले आहेत. आता सरकारने चर्चा केली पाहिजे.” मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी तुम्हाला मान्य आहे का? हे पत्रकारांनी विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, “या सगळ्या गोष्टी, ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं. सरकार आल्यानंतर सहा महिन्यांत आरक्षण देऊ म्हणणाऱ्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे. मी जरी आज काहीही म्हटलं तर माझ्या हातात काहीच नाही.”
जरांगेंच्या खांद्यावर बंदूक कुणी ठेवली आहे फडणवीसांना विचारा-उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की जरांगेंच्या खांद्यावर बंदुक ठेवून मराठा आरक्षणाचं राजकारण केलं जातं आहे. त्याबाबत काय वाटतं असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, कोण आहेत ते ? त्यांच्या पक्षात किंवा युतीत जे काही घमासान चाललं आहे त्यामुळे हे ते कुणाला उद्देशून बोलले? त्यांच्या बंदुकीचा रोख कुणाकडे आहे? हे त्यांना विचारा. जर एवढं असेल तर बंदुक ठेवेपर्यंत वेळ का आणली? देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊन येत्या नोव्हेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होऊनही हा प्रश्न का सुटत नाही? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे