मराठवाड्यावर आलेलं ओल्या दुष्काळाचं संकट हे फार भयंकर आहे. अनेक वर्षांमध्ये असं ओल्या दुष्काळाचं संकट आलं नव्हतं. जमिनी खरवडल्या आहेत, गुरढोरं वाहून गेली आहेत. शेतकरी आणि त्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य वाहून गेलं आहे. सरकारने जी मदत देऊ केली आहे ती फारच तुटपुंजी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ओला दुष्काळ पडलेल्या पाच जिल्ह्यांचा दौरा केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“सध्या साडेतीन हजार एकरी पैसे येत आहेत. साफसफाई करायला गेलं तरीही त्याच्या दुप्पट पैसे खर्च होणार आहे. पंजाबमध्येही असंच संकट आलं होतं तिथल्या सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर केली आहे. पंजाबने जर अशी मदत केली आहे तर महाराष्ट्राने हेक्टरी ५० हजारांची मदत करायला हरकत नाही. मला यात राजकारण करायचं नाही पण सरकारने मदत केली पाहिजे. मी गाडीतून येताना अजित पवारांचं म्हणणं ऐकलं ते म्हणाले ४५ हजार कोटी आम्ही लाडक्या बहिणींसाठी खर्च करतो आहोतच ना. त्यांचं असं म्हणणं ही एक प्रकारे सत्तेची मस्ती आहे. लाडक्या बहीण योजनेत जे पैसे दिले जात आहेत त्या रक्कमेत आजच्या या परिस्थितीत १५०० रुपयांमध्ये त्या बहिणीचं घर सावरलं जाणार आहे का? याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कर्जमुक्तीची योग्य वेळ मुख्यमंत्री पंचांग बघून सांगणार आहेत का?

शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत. सगळ्या नोटिसा एकत्र करा आणि जवळच्या शिवसेना शाखेत नेऊन द्या पुढे काय करायचं ते आम्ही पाहतो. मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही कर्जमुक्ती केली होती ती आम्ही विसरलो नाही. मला काय मी काय केलं होतं त्याची जाहिरात करायची नाही. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची गरज आहे. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यावर करु, म्हणजे निवडणुका आल्यावर करणार असंच ना? २०१९ लाही जी कर्जमाफी दिली होती त्यात इतक्या अटी होत्या की शेतकरी म्हणत होता यापेक्षा मी गळफास लावून घेतो. शेतकऱ्यांना मी सांगतो आहे की तुम्ही आत्महत्या करु नका. पण माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचाग बघून सांगणार आहात का? मुहूर्त पाहून सांगणार आहात का? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे ती झाली नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरू असा इशारा आज आम्ही देत आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.