पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपा नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेसह (उद्धव टाकरे गट) विरोधी पक्षांवर घराणेशाहीचे आरोप करत आहेत. या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यवतमाळच्या राळेगावात शिवसेनेच्या ठाकरे गटाने जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमांतर्गत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राळेगावात आयोजित जनसभेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर भाजपाकडून होत असलेल्या घराणेशाहीच्या आरोपांना उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांना सामान्य शिवसैनिकाऐवजी त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असा आरोप अमित शाह आणि इतर भाजपा नेत्यांनी केला आहे. या आरोपांनाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, मागे जळगावच्या सभेत अमित शाह म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय. तुम्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने घराणेशाहीबद्दल बोलत आहात. मग एकदा होऊनच जाऊ दे. मोदी आणि तुम्ही तुमचं घराणं सागावं, मी माझं घराणं सांगतो. मुळात मला माझ्या घराण्याची माहिती सांगायची गरजच नाही. माझे वडील, माझे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा हे जनतेच्या सेवेत होते. प्रत्येकाने स्वतःला जनतेसाठी झोकून दिलं होतं.

करोना काळात मी काय केलं हे सर्वांनी पाहिलं आहे. परंतु, माझ्या आजोबांच्या वडिलांनी म्हणजेच सीताराम ठाकरे यांनी प्लेगच्या साथीच्या काळात मोठं काम केलं होतं. तेव्हा आमचं घराणं पनवेलमध्ये राहत होतं. आपल्या देशात प्लेगची साथ आली होती. प्लेगमुळे लोकांचे मृत्यू होत होते. त्या कठीण काळात लोकांचे मृतदेह वाहून न्यायला कोणी नव्हतं. तेव्हा सीताराम ठाकरे यांनी लोकांचे मृतदेह वाहून नेण्याचं काम केलं. त्याचदरम्यान त्यांनाही प्लेग झाला आणि ते मृत्यूमुखी पडले. असा हा आमच्या ठाकरे घराण्याचा इतिहास आहे.

हे ही वाचा >> “घराणेशाहीबद्दल बोलायत, मग आता होऊन जाऊ दे…”, उद्धव ठाकरेंचं भर सभेतून मोदी-शाहांना आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यला मुख्यमंत्री करण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा. लोकसभेच्या आधी हे लोक माझ्यावर आरोप करतायत, परंतु, लोकसभा लढवून मुख्यमंत्री होता येत नाही. लोकांनी विधानसभेला मतं दिली नाही तर कोणीही मुख्य होऊ शकत नाही. मुख्यमंत्रिपद म्हणजे जय शाहला गणपती करून बीसीसीआयच्या सचिवपदावर बसवलंय तसलं पद नाही. तुम्ही लोक आमच्या मुलाबाळांवर बोलणार असाल तर आम्ही तुमचे धिंडवडे का काढणार नाही? तुमची जी काही मस्ती चललीय ती आम्ही पाहतोय. त्याला ही जनता उत्तर देईल.