Uddhav Thackeray on Gen Z Voting in local body elections : राज्यातील आणि केंद्रातील सरकार जेन झी पिढीच्या मुलांना का घाबरतंय? असा प्रश्न शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. ते म्हणाले, “शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण सरकारशी दोन हात करू” तसेच त्यांनी मराठवाड्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं. यासह त्यांनी दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की “सर्व मतदारांनी शिवसेनेच्या (उबाठा) जवळच्या शाखेत जाऊन मतदार याद्यांमध्ये तुमचं नाव आहे का? कोणी तुमचं नाव वगळलेलं नाही ना? तुमचा पत्ता बदललेला नाही ना? तुमचं वय, लिंग अथवा धर्म बदललेला नाही ना याची खात्री करा.

उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणूक आयोगाने मतदारांसाठी १ जून ही कट ऑफ डेट ठेवली आहे. याचा अर्थ १ जून नंतर ज्या मुलांचं वय १८ वर्षे पूर्ण झालेलं असेल त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या मुलांना त्यांचा मतदानाचा अधिकार वापरता येणार नाही. एकीकडे जगभर याच वयातील मुलं रस्त्यावर उतरून क्रांती करत आहेत. त्यांना जगाने जेन झी असं नाव दिलं आहे. या जेन झी पिढीतील मुलांना हे सरकार का घाबरतंय?

महाराष्ट्रात ४५ लाख बोगस मतदार घुसवले अन् इथल्या मुलांचा मतदानाचा हक्क हिरावला : उद्धव ठाकरे

शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख म्हणाले, “लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी ४५ लाख बोगस मतदार महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये घुसवले. हे कोणी केलं? कसं केलं? हे अद्याप समजलेलं नाही. परंतु, याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला. आता १ जुलैनंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना अधिकृतपणे मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, ती महाराष्ट्रातील तरुण मुलं व तरुणी मतदान करू शकत नाहीत. मी या मुलांनाही आवाहन करतो की तुम्ही शिवसेनेच्या शाखेत येऊन तुमचं नाव नोंदवा. जेणेकरून आपल्याला कळेल की या सरकारने किती मुलांना मतदानापासून वंचित ठेवलं आहे.”

“निवडणूक आयोगाने तुमच्या घरात भूतं घुसवलेली नाहीत ना याची खात्री करा”

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं की “सर्वांनी शिवसेनेच्या शाखेत येऊन मतदार याद्या तपासा. तुमच्या घरातही तुमच्या परवानगीशिवाय ४०-५० माणसं घुसवली असतील, नोंदवली असतील त्याची तपासणी करा. आपल्या परवानगीशिवाय आपल्या घरात राहणारी माणसं आहेत का ते पाहा. निवडणूक आयोगाने घुसवलेली ही भूतं आपल्या घरात तर राहात नाहीत ना याची खात्री करा.”