माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावातील पाचोऱ्यात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला. आमचे सरकार देणारे होते, घेणारे नाही. मी घरी बसून जे करू शकलो, ते तुम्ही वणवण फिरून करू शकणार नाही, असं टीकास्र उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्यपाल मलिक यांनी पुलवामाबद्दल माहिती दिली. ‘पुलवामाच्या घटनेत ४० सैनिक शहीद झाले. ही पूर्ण चूक गृहमंत्रालयाची होती,’ असं सत्यपाल मलिकांनी सांगितलं. भ्रष्टाचार, काश्मीरचे ३७० कलम हटवण्याबद्दल सत्यपाल मलिक बोलले. पण, उत्तर देणं लांब राहिलं, सत्यपाल मलिकांच्या मागे सीबीआय लावली आहे.”
“काहीजण खोक्यासाठी आणि काहीजण लाचारासाठी जातात”
“दोन-तीन दिवसांपूर्वी जवान मारले गेले. तरीही सर्व मंत्री देशासमोरील सर्व प्रश्न संपलेत असं समजून विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात ठाण मांडून बसले आहेत. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जात आहे. तुरुंगात जाता की भाजपात येता, हे देशात सुरू आहे. काहीजण खोके आणि लाचारासाठी जात आहेत. आमच्यात असले तर भ्रष्ट आणि तुमच्यात आलं की शुद्ध,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे.
“सत्यपाल मलिक यांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या प्रचारासाठी जवान मारले असतील, तर भारतमातेच्या सुपूत्रांचे जीव भाजपासाठी ओवाळून टाकायचे का?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
हेही वाचा : “आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं…”, गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले…
“भगव्याला लागलेला कलंक धुवायचा आहे”
“निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आजही माझ्याबरोबर आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहे. तो कलंक लावणारे हात राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत,” असं टीकास्र उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर सोडलं आहे.