शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सध्या कुटुंब संवाद दौरा चालू आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी रायगड येथील जनतेशी संवाद साधला. यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या विरोधकांवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले त्याच विरोधकांना भाजपाकडून निमंत्रण मिळतंय. मंत्री, उपमुख्यमंत्री आणि थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली जात आहे. तुम्ही आमच्याकडे आल्यावर तुम्हाला मंत्रिपद मिळणारच आणि हीच मोदींची गॅरंटी आहे असं सांगितलं जात आहे. भाजपा म्हणजे भ्रष्ट जनतेचा पक्ष आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाच्या प्रचाराला मीच आलो होतो. यांना (नरेंद्र मोदी) पंतप्रधान करा असं मीच सांगितलं होतं. आताही मीच आलोय. कारण आता आपल्याला हुकुमशाही नको. गेल्या आठवड्यात २६ जानेवारी रोजी देशाने प्रजासत्ताक दिन साजरा केला. तेव्हा आपण म्हणालो प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. आता परत एकदा तीच प्रार्थना करावी लागेल. कारण, पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन होणारच नाही असं वाटतंय. या लोकांनी देशाची राज्यघटना पायदळी तुडवली आहे. भर दिवसा घटनेचा मुडदा पाडला जात आहे. लोकशाहीचा मुडदा पाडतायत. प्रत्येकावर दबाव आणतायत. जे जे विरोधी पक्षात आहेत, विरोध करतायत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपा आणि शिंदे गटाला उद्देशून म्हणाले, अरे तुम्ही माझा पक्ष चोरलात, सगळं चोरलंत, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागला आहात? तुम्ही आगामी निवडणुकीत ४०० पार होणार आहात ना? मग व्हा ना ४०० पार, आता तर आम्ही बघतोच, तुम्ही ४०० पार कसे होताय. माझ्या साध्या साध्या लोकांना पोलिसांतले जुने खटले काढून त्रास दिला जात आहे. जुनी प्रकरणं उकरून आयकर विभागाच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. परंतु, तुमच्याकडे जे टोणगे आलेत, जे बाजारबुणगे आलेत त्यांच्यावरील खटल्यांचं काय झालं?

हे ही वाचा >> सिद्दीकी पिता-पुत्रांच्या अजित पवार गटातील प्रवेशाची चर्चा; आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले, “होय, आम्ही दादांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या महिन्यात लवादाने नव्हे लबाडाने आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल दिला, मी म्हणेन न्याय नव्हे निकाल दिला. त्या लबाडाचं भांडाफोड आम्ही जनता न्यायालयात केलं. तसंच तुमच्याकडे आलेल्या भ्रष्ट लोकांचं भांडाफोड आम्हाला सगळ्या जनतेसमोर करावं लागेल. तिकडे झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक केली, नितीश कुमार तुमच्याकडे आल्यावर त्यांच्या सगळ्या केसेस माफ केल्या. नितीश कुमार यांच्या आप्तस्वकीयांवर धाडी पडल्या होत्या, त्याचं पुढे काय होणार आहे. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना समन्स पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात रोहित पवार यांची चौकशी चालू आहे. किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकरांच्या चौकशा चालू आहेत. परंतु, मी या भाजपाला एवढंच सांगेन, तुम्ही कितीही कारवाया करा, आम्ही झुकणार नाही.