शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी औसा या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित करत असलेल्या प्रश्नाला जशास तसं उत्तरही दिलं. इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पॅकेज जाहीर करताना पाहणी केली होती की नाही?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी दिलं आव्हान

उद्धव ठाकरे विकासावर बोलले आहेत असं दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले मी टोमणे मारत नाही. मी बळीराजाचे प्रश्न मांडतो आहे. देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या आधी काय म्हणाले होते? शेतकऱ्याचा सातबारा आम्ही करणार कोरा कोरा कोरा. आता माझं त्यांना आव्हान आहे देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले हे दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बोले तैसा चाले असं दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा. मी मुख्यमंत्री असताना हे स्वतः म्हणायचे ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता म्हणतात की, ओला दुष्काळ असं काही नसतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती तसं तुम्ही भाजपसाठी मतबंदी करणार का?, आता पुन्हा हे निवडणुकांमध्ये भुलथापा देणार, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राजा उदार झाला आणि हाती टरबूज दिलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घरचा शेतकरी संकटात असताना दुनियादारी करत प्रचाराला बिहारला जातायत. मला म्हणतात आता उद्धव ठाकरे घराबाहेर निघाले. अरे बाबा तुम्ही आधी आपलं घर बघा. शेतकरी संकटात आहेत, तुम्ही दुनियादारी करत फिरताय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओही दाखवला. या व्हिडीओमध्ये सातबारा कोरा करु, असं देवेंद्र फडणवीस बोलताना दिसत आहे. यावर हे दुतोंडी सरकार आहे. राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिले, अशी टीका करत शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार मिळालेच पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस उत्तर देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.