शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. ठाकरे यांनी जनसंवाद कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत त्यांनी आज दापोलीतल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट सांगितलं आहे की, भाजपाला देशाची राज्यघटना बदलायची आहे. त्यामुळेच त्यांना ४०० पार जायचं आहे (लोकसभेला ४०० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत). भाजपावाले एकदा का ४०० पार गेले की मग ते एक राष्ट्र एक निवडणूक घेतील. देशभरात त्यांचा मनमानी कारभार सुरू होईल.

उद्धव ठाकरे म्हणाले, आत्ता देशात महापालिका निवडणुका होत नाहीयेत. काश्मीरमध्ये चार-पाच वर्षांपासून विधानसभेची निवडणूक झालेली नाही. ही लोकसभा (२०२४) त्यांच्या घशात गेली तर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होईल की नाही ते सागता येत नाही. ही एकच निवडणूक झाली की नरेंद्र मोदी दिल्लीत अध्यक्ष म्हणून बसतील. देशात अध्यक्षीय पद्धत सुरू करतील. मग ते सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्ये त्यांच्या मर्जीतल्या (न्यायपालिकेतल्या) लोकांना न्यायमूर्ती म्हणून नेमतील. रशियात पुतिनही तेच करतात. तसंच आपल्या देशातही पंतप्रधान न्यायमूर्तींची नेमणूक करण्यास सुरुवात करतील. तसेच देशात एकच निवडणूक घेतली जाईल.

भाजपावाले देशात एकच निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर त्यांनी न्यायपालिकेत ढवळाढवळ चालवली आहे. बंगालमधील न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी नुकताच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या देशात आजपर्यंत एक चुकीची पद्धत होती की, न्यायमूर्ती निवृत्तीनंतर एखाद्या पक्षात जायचे, मग त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली जायची. परंतु, गंगोपाध्याय यांनी त्याच्याही एक पाऊल पुढे टाकलं. त्यांनी न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिला आणि ते भाजपात गेले. तसेच त्यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. गंगोपाध्याय तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, गेले काही दिवस भाजपा माझ्या संपर्कात होती. तसेच मीदेखील सातत्याने भाजपाच्या संपर्कात होतो. हे सगळं पाहिल्यावर या भाजपावाल्यांनी कशावरून आपल्या देशातली न्यायप्रक्रिया नासवली नसेल?

हे ही वाचा >> पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास, “धनंजय मुंडे बरोबर असल्याने प्रीतमपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून येईन”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपावाले जे काही करतायत ते आम्ही करू शकतो का? सर्वोच्च न्यायालयात आमचादेखील एक खटला चालू आहे. आम्ही न्यायमूर्तींशी संपर्क साधू शकतो का? आमच्यासाठी कोणी दारं उघडेल का? आम्ही जशी प्रत्येक गोष्टीची मर्यादा सांभाळतो तशी ते लोक का सांभाळत नाहीत. सध्या तरी आम्ही न्यायपालिकेवर विश्वास ठेवून आहोत, आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे.